चंद्रपूर:- ताडोबाच्या बफर क्षेत्राला लागून असलेल्या चोरगाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा. मृत शेतकऱ्याचे नाव संजय माधवराव सिडाम असून ते मूळचे राजुरा तालुक्यातील केळझरचे रहिवासी होते. चोरगाव येथे राहणाऱ्या आपल्या सासऱ्यांच्या शेतीची देखभाल करण्यासाठी ते आले होते.
अवघ्या ४ दिवसांपूर्वीच संजय यांनी अत्यंत आशेने शेतात कपाशीची लागवड केली होती. वन्यप्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी ते शेताभोवती सौरऊर्जेवर चालणारे बॅटरीचे कुंपण लावत होते. पण शेजारच्याच दाट झाडीत दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर पाठीमागून अचानक झडप घातली. हा हल्ला इतका भीषण होता की संजय यांना मदतीसाठी ओरडण्याचीही संधी मिळाली नाही. अवघ्या ४ दिवसांपूर्वी हिरवीगार दिसणारी कपाशीची शेती आज रक्ताने माखलेली पाहून संपूर्ण गावकऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे.

