चंद्रपूर:- समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा रक्ताने माखला असून एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात चंद्रपूरमधील एकाच कुटुंबातील तब्बल ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका बाजूला घरात शासकीय नोकरी लागल्याचा प्रचंड आनंद होता, पत्नीच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी जॉइनिंगसाठी हे कुटुंब चंद्रपूरवरून अकोल्याकडे जात होते, मात्र समृद्धी महामार्गावर या हसत्याखेळत्या कुटुंबाचा काळ वाट पाहत होता. एका क्षणात या कुटुंबातील तीन पिढ्या संपल्या आहेत.
हा भीषण अपघात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक १०६ जवळ घडला. चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील रहिवासी असलेले जीवने कुटुंब कारने अकोल्याच्या दिशेने जात होते. आरती जीवने यांना नवीन शासकीय नोकरी मिळाली होती आणि त्याच नोकरीवर रुजू होण्यासाठी पती भास्कर जीवने आपल्या संपूर्ण कुटुंबासह गाडी चालवत होते. मात्र, धामणगावनजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मोठ्या कंटेनरला या भरधाव वॅगनार कारने पाठीमागून अत्यंत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की कारचा पुढचा भाग थेट कंटेनरच्या खाली घुसला आणि गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात महादेव जिवाजी जीवने, लताबाई महादेव जीवने, भास्कर महादेव जीवने, आरती भास्कर जीवने, त्रिशा भास्कर जीवने यांचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारचा चक्काचूर झाल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. सर्व मृतदेह धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
ज्या घरातून काही तासांपूर्वी आनंदाने हे कुटुंब निघालं होतं, तिथे आता फक्त आणि फक्त आक्रोश शिल्लक राहिला आहे. एकाच कुटुंबातील ३ पिढ्या एका फटक्यात नष्ट झाल्याने संपूर्ण चंद्रपूर शहरावर शोककळा पसरली आहे.

