चंद्रपूर / यवतमाळ:- चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील खापरी गावात शुक्रवारी दुपारी वीज कोसळून एका शेतकऱ्याचा तर वणी तालुक्यातील टाकळी (चिखली) येथे १२ शेळ्यांसह शेळक्याचा मृत्यू झाला.
शेतकरी रनभीड रामजी रामटेके (५०) हे वादळवारा सुरू झाल्याने बैलाला गोठ्यात बांधण्यासाठी ते घराबाहेर निघाले असता अंगावर वीज कोसळली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी चिमूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मृताच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दुसरी घटना वणी तालुक्यातील टाकळी (चिखली) येथे घडली. विलास मानकू तुमराम (५५), असे मृताचे नाव आहे. ते आपल्या शेळ्या चारण्यासाठी गावालगतच्या शेतशिवारात गेले होते. दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी वीज कोसळल्याने विलास तुमराम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चरत्त असलेल्या १२ शेळ्याही विजेच्या तडाख्यात दगावल्या. माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाईसाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


