चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याची ॲथलेटिक्सपटू श्रेया नितीन इथापे हिने क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. देरवण येथे ४० व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत श्रेयाने १०० मीटर हर्डल स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करत सुवर्णपदकास गवसणी घातली आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेतील उत्कृष्ट विजयाच्या बळावर श्रेयाची आता चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी अधिकृत निवड झाली आहे. तिच्या या उज्ज्वल यशामागे तिची कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्द यांचा मोठा वाटा असून, राज्यस्तरावर अव्वल स्थान पटकावत तिने चंद्रपूरच्या क्रीडा विश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही श्रेया अशीच दर्जेदार कामगिरी करून देशपातळीवर चंद्रपूरचा झेंडा फडकवेल, असा दृढ विश्वास क्रीडा वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

