Chandrapur Collector: जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक व विक्रीस बंदी

Bhairav Diwase

चंद्रपूर:- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये, तसेच पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा, यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर सर्व प्रकारच्या सुक्या व ओल्या चाऱ्याची वाहतूक व विक्री करण्यास जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सक्त मनाई केली आहे. याबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 (बीएनएसएस) च्या कलम 163 अन्वये आज (दि. 6) आदेश जारी करण्यात आला आहे.


महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये ट्रीगर-1 (प्रथम कळ) दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत तसेच सीमावर्ती भागातून राज्याबाहेर मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात गंभीर चारा टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची तसेच त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर हिरवा चारा, कडबा, कोणत्याही प्रकारची कुट्टी, पेंढ, टीएमआर तसेच इतर सर्व प्रकारच्या पशुखाद्याची वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तथापि, शासकीय योजनेंतर्गत करण्यात येणारी चारा वाहतूक तसेच पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून सूट राहणार आहे.


या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, 2023 (बीएनएस) च्या कलम 223 अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहील. सदर आदेश दि. 1 ऑक्टोबर 2026 पासून पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहणार आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि चारा वाहतूकदारांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.