केतन हुंडाई वर्कशॉपमध्ये घटना!
चंद्रपूर:- ताडाळी येथील 'केतन हुंडाई वर्कशॉप'मध्ये काम करत असताना विजेचा तीव्र झटका लागल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर त्याचा सहकारी जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतकाचे नाव सारंग उर्फ मोहन कोयताडे (वय २१ वर्षे, रा. मोरवा) तर जखमीचे नाव शुभम उमाटे (वय २९ वर्षे) असे आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन कोयचाडे आणि शुभम उमाटे हे दोघे तरुण या वर्कशॉपमध्ये डेंटिंग आणि पेंटिंगचे काम करतात. आज सकाळी नेहमीप्रमाणे दोघे कामावर पोहोचले. काहीतरी जळाल्याचा किंवा वेगळा वास येत असल्यामुळे त्यांनी टिनाच्या शेडवर चढून पाहणी केली.
दरम्यान, वर्कशॉपच्या जवळ असलेल्या एका झाडाला जिवंत विद्युत तारेतून झाडामध्ये विजेचा प्रवाह पसरला होता. मोहन कोयचाडे यांचा चुकून या झाडाला स्पर्श झाला आणि त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला.
सोबत असलेला सहकारी शुभम उमाटे यांनी मोहनला विजेच्या झटक्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात शुभम यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. कसेतरी त्यांना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच मोहन कोयताडे यांचा मृत्यू झाला. तर जखमी शुभम उमाटे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच मोरवाचे उपसरपंच भूषण पिदूरकर व इतर ग्रामस्थ रुग्णालयात दाखल झाले. "एक होतकरू आणि तरुण मुलगा काळाच्या पडद्याआड गेल्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे," असे सांगत त्यांनी मृतकाच्या परिवाराला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. या दुर्घटनेमुळे वर्कशॉपमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

