Dr. S. B. Kishor: डॉ. एस. बी. किशोर यांना 'राष्ट्रीय अचिव्हर पुरस्कार-२०२६' जाहीर!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- शैक्षणिक, संशोधन आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. बी. किशोर यांना गोंडवाना विद्यापीठातर्फे 'प्रथम राष्ट्रीय अचिव्हर पुरस्कार-२०२६' प्रदान करण्यात आला आहे.


गडचिरोली येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


डॉ. एस. बी. किशोर यांना अध्यापनाचा २६ वर्षांचा आणि संशोधन मार्गदर्शनाचा १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ८२ पुस्तके लिहिली असून, ७ पेटंट्स (ज्यात ऑस्ट्रेलियन पेटंटचाही समावेश आहे) आणि ५ कॉपीराइट्स मिळवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १८ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असून, त्यांचे शैक्षणिक व्हिडिओ ४४ देशांतील ३ लाख ३४ हजारांहून अधिक युजर्सनी पाहिले आहेत.


यापूर्वी त्यांना आरटीएम नागपूर विद्यापीठाचा 'आदर्श शिक्षक पुरस्कार', 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स', 'आयआयटी बॉम्बेचा मास्टर अवॉर्ड' यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार लाभले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन परिवार आणि विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनव शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.