Top News

एक्सपायर झालेल्या खाद्यपदार्थांची पुन्हा बाजारात विक्री.

Bhairav Diwase.    March 25, 2021

चंद्रपूर:- कचऱ्यात फेकलेल्या कालबाह्य झालेल्या खाद्यवस्तू पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर महानगर पालिकेच्या घनकचरा डेपोत हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने मनपा प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर कंपोस्ट डेपोतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दोन महिन्यापूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाने महापालिकेला हा धक्कादायक प्रकार सुरु असल्याची माहिती दिली आहे. पण महापालिकेकडून हा प्रकार दुर्लक्ष केला जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. #tv9marathi 

नेमकं प्रकरणं काय?

चंद्रपूर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरु आहे. चंद्रपूर शहरातील घनकचरा संकलनाचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. चंद्रपूर शहरातील भाजीबाजार, दुकाने आणि रहिवासी परिसरातून दररोज कचरा जमा केला जातो. हा कचरा मनपाच्या कंपोस्ट डेपोमध्ये टाकला जातो.

हा डेपो बल्लारपूर मार्गावर अष्टभूजा वार्डात आहे. या ठिकाणी कचरा संकलनाचे काम असणाऱ्या कंपनीची माणसं कचऱ्याची विल्हेवाट लावतात आणि देखरेख ठेवतात. या कंपोस्ट डेपोला असलेली संरक्षण भिंत मोडकळीस आली आहे. त्यामुळे या डेपोत काय सुरु असते, हे दिसते. #adharnewsnetwork

स्थानिक नागरिकांकडून पर्दाफार्श.......

या कंपोस्ट डेपोत कचऱ्यात फेकलेली थोडी चांगल्या स्थितीतील फळे, भाजीपाला वेगळा केला जातो. त्यानंतर तो पुन्हा शहरात विक्रीसाठी पाठवला जात असल्याचे परिसरातील रहिवांशाच्या लक्षात आले. विशेष म्हणजे सीलबंद किंवा मुदत संपलेली स्नॅक्सची पाकिटेही कचऱ्यातून वेगळी करून विक्रीसाठी पाठविली जात होती.

अशाप्रकारे फेकून दिलेला खाद्यपदार्थांचा साठा घेऊन बाहेर पडताना एका गाडीवर पोलिसांनी पाळत ठेवली होती. यानंतर रस्त्यात ती गाडी पकडली आहे. या गाडीतील ड्रायव्हर तसेच इतर व्यक्ती फरार झाले आहे. यात सुमारे 60 किलो वजनाचा खाद्यसाठा आढळून आला आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या काही कंत्राटी कामगारांकडून हा प्रकार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

FDA कडून महापालिकेला पत्र.......

तर दुसरीकडे कंपोस्ट डेपोत जमिनीत पुरलेला सुगंधित तंबाखू कर्मचाऱ्यांनी उकरुन काढून त्याची विक्री केली होती. याची तक्रार परिसरातील नागरिकांनी अन्न आणि औषध प्रशासनाला केली. त्याबाबत मनपाला पत्र पाठवले होते. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे कंपोस्ट डेपोत सुरु असलेला प्रकार बिनबोभाटपणे सुरु राहिला. आज मात्र त्यांचे बिंग फुटले.

यासंदर्भात आता मनपाचे अधिकारी सतर्क झाले आहेत. त्यांनी कंपोस्ट डेपोचे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मनपाचे उपायुक्त विशाल वाघ यांनी दिली. तर दुसरीकडे अन्न आणि औषध प्रशासनाने हा प्रकार दुसऱ्या वेळेस घडत असल्यावर शिक्कामोर्तब केले.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे......

मुदतबाह्य आणि कालबाह्य झालेले सीलबंद अन्नपदार्थ, भाजी बाजारात उकिरड्यावर टाकलेली फळे, भाजीपाला पुन्हा एकदा शहरात विक्रीसाठी येत असेल तर या संपूर्ण प्रकरणाची गंभीरतेने चौकशी होणे गरजेचे आहे. कोरोनाकाळात आधीच नागरिक वेगवेगळ्या कारणाने आरोग्य चिंता आहे. त्यात हा नवा प्रकार काळजीत भर घालणारा आहे. #chandrapur

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने