Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
रविवार, डिसेंबर १४, २०२५
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात काल, शनिवारी, या तालुक्यात एक अत्यंत भयानक घटना घडली. गुंजेवाही येथील छाया अरुण राऊत वय 49 वर्षे या शेतकरी महिला सकाळी आपल्या शेतात धान आणि तुरीची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, सायंकाळ झाली तरी त्या घरी परतल्या नाहीत. यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तातडीने त्यांचा शोध सुरू केला.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास, शेताला लागून असलेल्या एका नाल्याजवळ छाया राऊत यांचा मृतदेह अत्यंत विदारक अवस्थेत आढळला. प्राथमिक तपासात, हा वाघाचा हल्ला असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचे अवयव तुटलेले होते, हात शरीरापासून वेगळे पडलेले आणि मान मोडलेली आढळली.
या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह तत्काळ रुग्णालयात नेण्यात आला, जिथे आज, रविवारी, त्याचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले.

