Sudhir Mungantiwar: "आता वाळूचे कण रगडल्यावर नोटा निघतात"; मुनगंटीवारांनी सरकारलाच धरलं धारेवर

Bhairav Diwase

मुंबई:- राज्याचे वाळू धोरण आणि वाळू माफियाच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाले आहे. अधिवेशनात दररोज ते प्रश्नांची सरबत्ती करून सरकाराला कोंडीत पकडत आहेत. आज त्यांनी पुन्हा एका लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पूर्वी वाळूचे कण रगडता तेल निघत होते या म्हणीचा उल्लेख करून 'आता वाळूचे कण रगडता नोटा निघत असल्याने' भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील एका भ्रष्ट उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधवच्या विरोधात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याने कार्यक्षेत्रात नसतानाही एक वाळूचा ट्रॅक्टर पकडला व पैसे घेऊन सोडून दिला. आणखी एक वाळूचा ट्रक त्याने १० दिवस जप्त करून पोलिस ठाण्यात ठेवला होता. पन्नास हजार रुपये घेतल्यानंतर तो सोडला. त्यानंतर तोच ट्रक पुन्हा दुसऱ्या तालुक्यात पकडण्यात आला. हा अधिकारी 'मेरा कोई बिघाड सकता' अशा शब्दांत दादागिरी करतो.

वरिष्ठ पोलिस अधिकारी त्याला वाचवत आहे. त्याची फाईल पुढे सरकू नये यासाठी रॅकेट पोलिस विभागात आहे. त्याला तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली. यावर गृह राज्यमंत्री पकंज भोयर यांनी विभागीय चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल असे उत्तर दिले. यानंतरचे सूत्र मुनगंटीवार यांनी आपल्या हाती घेतले. तत्काळ निलंबित करण्यास काय हरकत आहे? निलंबित करणे म्हणजे शिक्षा नव्हे, फक्त कारवाई हस्तक्षेप होऊ नये, त्याच्या उपस्थितीने करावाई कुलाही सकारात्मक व नकारात्मक परिणाम होऊ नये अशी मागणी केली.

हल्ली वाळूचे कण रगडता नोटा निघत नसल्याचे करवाई केली जात नाही का? असा सवालही मुनगंटीवार यांनी यावेळी उपस्थित करुन तुम्ही सुद्धा 'पत्थर के सनम' झाला का? अशी विचारणा केली. तसंच तत्काळ निलंबित केले नाही तर मी विधानसभेतच उपोषणाला बसतो असा इशारा यावेळी वडेट्टीवारांनी दिला. त्यानंतर गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी एसबीमार्फत चौकशी, विभागीय चौकशीचा अहवाल आल्यानंतर निलंबनाचे आश्वासन दिले.