चांदा पब्लिक स्कूलच्या विरोधात पालक मैदानात.

Bhairav Diwase
फी भरली नसल्याने विद्यार्थ्याची परीक्षा रोखण्याचा आरोप

शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी केली पालक व शाळा व्यवस्थापनाशी चर्चा.

सर्व विद्यार्थ्यांची परिक्षा 2 टप्यात घेणार असल्याची शाळेची ग्वाही.
Bhairav Diwase.    Sep 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर येथिल प्रसिद्ध व आघाडीची शैक्षणिक संस्था म्हणुन परिचित चांदा पब्लिक स्कूल प्रशासनाविरुद्ध पालक मैदानात उतरले असुन कळा जवळपास 300 पालकांच्या स्वाक्षरीचे निवेदन घेऊन 70 ते 80 पालक शाळेत पोहोचले.

सविस्तर वृत्त असे की चांदा पब्लिक स्कूल चंद्रपूर ही इंग्रजी माध्यमाची जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. हजारो विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. दरवर्षी जवळपास सर्वच पालक आपल्या मुलांची शाळेची फी प्रामाणिकपणे भरतात.

ह्यावर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे आणि त्यामुळे सुरू झालेल्या लॉक डाऊन मुळे सर्वांचेच जिवन अस्ताव्यस्त झाले आहे. सर्वानाच आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असुन अजुनही कित्येक लोक ह्या परिस्थितीमधुन बाहेर आले नाही. शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शैक्षणिक शुल्क आकारून इतर सर्व शुल्क माफ करण्याचे सांगितले आहे. तरीही कित्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळा पालकांवर दबाव टाकत असुन जबरदस्तीने शुक्ल वसुल करण्याची मोहिम सुरू आहे.

असाच प्रकार चांदा पब्लिक स्कूल मधेही होत असल्याचा आरोप करून काल पालकांनी शाळेकडे धाव घेतली. पालक शाळेत येणार असल्याची कुणकुण लागल्याने शाळा व्यवस्थापनाने आधीच पोलीस संरक्षण मागुन घेतले होते हे विशेष. चांदा ब्लास्ट जवळ आपली कैफियत मांडताना पालकांनी अनेक आरोप केले असुन ह्या संकटसमयी शाळेने पालकांना दिलासा द्यावा असा आग्रह असल्याचे स्पष्ट केले.



ह्या शाळेने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणुन ऑनलाईन वर्ग सुरू केले असले तरीही रोज सर्व विषयाचे अध्ययन होत नाही केवळ 2 ते 3 विषय अभ्यासले जात असुन शाळा मात्र संपुर्ण शुल्क आकारत असुन शाळेने शैक्षणिक शुल्काच्या 50% शुल्क आकारणी करावी ह्या मुख्य मागणीसह हे पालक शाळेच्या व्यवस्थानाला निवेदन देण्यास गेले होते.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे कालपासून विद्यार्थ्याची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार होती मात्र ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही त्यांना परीक्षेचे आय डी आणि पासवर्ड देण्यात आलेले नाही. ह्या प्रकारामुळे पालकांमध्ये संताप निर्माण झाला असुन पालक तसेच शाळा व्यवस्थापना दरम्यान संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. वस्तुतः शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यान्वये विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवता येत नसूनही शाळेने असा निर्णय घेतलाच कसा हा प्रश्न कायम असुन आमच्या संगणकीकृत व्यवस्थेमुळे त्यांना आय डी पासवर्ड मिळाला नसल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.

दोन्ही बाजूंनी माघार घेण्याचे नाकारल्यामुळे शेवटी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी पालक आणि व्यवस्थापन ह्यांच्यात बैठक झाली तरीही सन्मानजनक तोडगा निघाला नसल्याचे कळले आहे. 

त्यानंतर पालकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ह्यांना निवेदन दिले असुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ह्यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे. ह्याबाबतीत शाळा प्रशासन काय भुमिका घेते ह्याकडे पालकांचे लक्ष लागले असुन पालक मात्र निर्णायक लढा देण्याच्या मानसिकतेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

चांदा पब्लिक स्कूल च्या वतीने आज भुमिका स्पष्ट करण्यात आली असुन चांदा ब्लास्टला सुद्धा ह्याची प्रत पाठविण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापनाने आपल्या खुलाशात स्पष्ट केले आहे की काल सुरू झालेली परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाणार असल्याने काही विद्यार्थ्यांना दुसर्‍या टप्प्यात आय डी आणि पासवर्ड देण्यात येणार असुन कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही ह्याची शाळा काळजी घेत असुन पालकांनी धीर धरावा असे आवाहन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे शाळेला कर्मचारी शिक्षकांचे पगार द्यायचे असुन त्यासाठी निधी असणे आवश्यक आहे त्यामुळे फी मागण्यात येत असुन ज्यांना सध्या फी भरणे शक्य नाही अशा पालकांनी शाळेत येऊन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन पालकांशी चर्चा करून फी भरण्यास मुदतवाढ देण्यास तयार असल्याचेही सांगण्यात आले आहे.