(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- कोरोनाची लक्षणे दिसल्यावर किंवा इतर आजारांकरीता नागरीक डॉक्टरांच्या पात्रतेबाबत शहानिशा न करता उपचार घेतात. कुठलीही वैद्यकीय अर्हता नसलेल्या डॉक्टरांकडून चुकीचे उपचार झाल्यामुळे आजार बळावण्याची तसेच मृत्यू होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नागरीकांनी वैद्यक शास्त्राची पदवी, पदविका व संबंधीत वैद्यक परीषदेचे रजिस्ट्रेशन असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकाकडून उपचार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
वैद्यकीय अर्हता नसलेल्या डॉक्टरांकडून कोरोना सारखी लक्षणे असलेल्या जसे सारी, आयएलआय रुग्णांची माहिती प्रशासनास मिळत नाही. त्यामुळे प्रशासनास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास अडचणी निर्माण होतात.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वैद्यकीय अर्हता नसलेले डॉक्टर्स अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय करीत असून त्यांचेव्दारे नागरीकावर चुकीचे उपचार होऊन नागरीकांची आर्थिक फसवणूक सुध्दा होत आहे. अशा डॉक्टरांवर तालुका स्तरीय पथकांनी त्वरीत धाडी टाकून त्याच्या विरूद्ध संबंधीत पोलीस स्टेशनला गुन्हे नोंदवावेत अशा सुचना सुध्दा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.