नातवावरचा वार आजीने झेलला, टोपलीने मारुन बिबट्याला पळवला.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 17, 2020

यवतमाळ:- येथील चालगणी गावातील एका आजीबाईँच्या धाडसाची गोष्ट सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. चालगणीतल्य आजी तिच्या नातवाला वाचवण्यासाठी थेट बिबट्याला भिडली आणि तिने तिच्या नातवाचे प्राणही वाचवले आहेत.

जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील चालगणी येथील धुरपताबाई सातलवाड ही महिला आपला नातू रितेश सोबत शेतातील सोयाबीन काढण्यासाठी जात होती. त्याच वेळी बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक लहानग्या रितेशवर हल्ला केला.

त्यावेळी कोणतीही भीती न बाळगता धुरपताबाईंनी हातातील टोपले बिबट्यावर फेकले.

आजींनी केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर चवताळलेल्या बिबट्याने नातवाला सोडून आजींवर हल्ला केला. बिबट्याने आजींच्या मानेवर पंजाने वार केला. तसेच जबड्याने त्यांच्या हाताचा लचका तोडला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे आजी विव्हळल्या. तिथे आरडाओरड सुरु झाली. त्यामुळे आजूबाजूच्या शेतशिवारातील लोक एकत्र आले. काहींनी लगेच आजींकडे धाव घेतली.

लोकांची मोठी गर्दी झालेली पाहून बिबट्या घाबरला. लोक बिबट्यावर हल्ला करणार एवढ्यात बिबट्या तिथून पळून गेला. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे आसपासच्या परिसरातील शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण आहे. पण आजींच्या साहसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.