जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी:- ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा.

Bhairav Diwase
      Bhairav Diwase. Oct 24, 2020

गडचिरोली:- जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यापासून आदिवासींची परिस्थिती, आरोग्य सुधारले आहे. दारू पिणार्‍यांच्या संख्येत घट झाली आहे. दारू विक्री आदिवासी समाजाला घातक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी. दारूबंदी शिवाय विकास अशक्य आहे, अशी सूचना ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांनी केली आहे. तसेच मेंढा येथे तालुका ग्रामसभा महासंघाच्या बैठकीत दारूबंदी कायम ठेवण्याचा ठराव घेऊन दारूबंदी मजबूत करण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा:- गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी..... 

           पूर्वी आदिवासी समाजातील रितीरिवाज, परंपरे पुरतीच दारू गाळल्या जात होती. मात्र, आता दारूची विक्री होत असल्यामुळे आदिवासी समाजातील युवक, पुरुष दारूच्या आहारी गेले आहेत. दारुमुळे कित्येक आदिवासींचा मृत्यू झाला आहे. कुटुंब उध्वस्त झाले आहेत. दारूच्या नशेत बुडालेल्या आदिवासींचा बाहेरून आलेले कंत्राटदार, कंपन्या शोषण करीत आहेत. यासाठी जिल्ह्यात दारूबंदी आवश्यक असल्याचे मत देवाजी तोफा यांनी मांडले आहे.
गावा-गावातील महिला संघटित होऊन दारुमुक्त जिल्ह्याची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करीत आहेत. ग्रामसभा, व्यसनमुक्त समिती व महिलांनी संघटित होऊन दारूबंदीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात विषारी दारू विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करीत त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करावे. गावात ग्रामसभा, तालुका व जिल्हा महासंघ महाग्रामसभा द्वारा ठराव घेऊन जिल्हा दारूबंदी कायम ठेवण्यासाठी मागणी करणार आहोत. दारूबंदी शिवाय आमचा विकास होणार नाही, असे मत जेष्ठ समाजसुधारक देवाजी तोफा यांनी मांडले आहे.
धानोरा तालुक्यातील दारूबंदी कायम टिकून राहण्यासाठी देवाजी तोफा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका ग्रामसभा महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीत दारूबंदी मजबूत करण्याचा ठराव घेण्यात आला.