वरोरा:- प्रेयसी मोबाइलला प्रतिसादच देत नसलेल्या व्यतीत झालेल्या प्रियकराने चाकू घेऊन थेट प्रेयसीचे घरं गाठले. प्रेयसी घरी नव्हती, मात्र तिची आजी प्रियकरला दिसताच त्याने तिच्यावर चाकू हल्ला करून पळ काढला. ही थरारक घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वरोरा शहरात घडली. याप्रकरणी जखमी आजीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. निलेश पुरुषोत्तम ढोक (२५, रा. पावना, भद्रावती) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
वरोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवतीचे एका युवकासोबत प्रेम जुळले. मात्र मागील काही दिवसांपासून प्रेयसीने युवकाच्या मोबाईलला प्रतिसाद देत नव्हती. सातत्याने आपला कॉल व मॅसेज टाळत असल्याने व्यथित झालेल्या युवकाने फिल्मीस्टाईल थेट दुचाकीवरून चाकू घेऊन तिच्या घराचा रस्ता धरला. युवक घराबाहेर चाकू घेऊन प्रेयसीला जोरजोराने बोलवत होता. घाबरलेल्या प्रेयसीच्या आई-वडिलांनी घरातील सर्व दारे बंद केली.
मात्र प्रेयसीची आजी बाथरूममध्ये होती. ती बाहेर येताच आरोपीने आजीच्या गळ्यावर चाकू लावून तिला जखमी केले. दरम्यान, प्रेयसी घरात नसल्याचे लक्षात येताच, युवक दुचाकीवरून तिच्या महाविद्यालयाकडे निघाला, परंतु ती त्याला तिथेपण सापडली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जखमी आजीने वरोरा पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी युवकाला अटक केली आहे. पुढील तपास वरोरा पोलिस करत आहेत.

