चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर अखेर नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. अकुनुरी नरेश, भाप्रसे (IAS) यांची चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्याच्या आयुक्त श्रीमती विद्या गायकवाड यांच्या जागी पदभार स्वीकारतील.
शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, अकुनुरी नरेश यांना सूचना देण्यात आली आहे की, त्यांनी त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्या सल्ल्यानुसार अन्य अधिकाऱ्याकडे त्वरित सोपवावा. यानंतर, त्यांनी नवीन पदभार म्हणजे चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार श्रीमती विद्या गायकवाड यांच्याकडून तातडीने स्वीकारावा. ही महत्त्वपूर्ण नियुक्ती आणि पदभार हस्तांतरणाचे परिपत्रक अपर सचिव अनुष्का दळवी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे आता चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारात बदल अपेक्षित आहे.

