Save Rambag : रामबाग मैदानावर पुन्हा एकदा संकट! जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी पुन्हा खड्डा; नागरिकांचा एल्गार

Bhairav Diwase

चंद्रपूर:- प्रदूषणाने त्रस्त झालेल्या आपल्या शहराच्या फुफ्फुसा समान असलेल्या रामबाग मैदानावर पुन्हा एकदा संकट ओढवले आहे. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी येथे नव्याने खड्डा खोदण्यात आल्याने, रामबाग वाचविण्यासाठी नागरिकांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.

काही महिन्यांपूर्वी, जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी येथे खड्डा खोदला गेला होता. त्यावेळी शहरातील जागरूक नागरिक, विविध संघटना, क्रीडाप्रेमी आणि योग ग्रुप्सनी एकत्र येत 'महापंचायत' घेऊन या बांधकामाला तीव्र विरोध केला होता. नागरिकांच्या एकजुटीमुळे तो खड्डा तेव्हा बुजवण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा रामबाग मैदानाजवळ नवीन खड्डा खोदण्यात आला आहे.


शहरातील इतर ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध असताना, निसर्गरम्य आणि सौंदर्याने नटलेल्या या क्रीडांगणावर जिल्हा परिषदेची इमारत बांधण्याचे नियोजन करणे, कितपत योग्य आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंनी जिल्हा परिषद प्रशासनावर दिशाभूल करण्याचा थेट आरोप केला आहे. खेळाचे मैदान वाचवण्याची ही लढाई आता कोणत्या टप्प्यावर जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.