Pombhurna News: घाटकुळ अतिवृष्टी गैरव्यवहार; नऊ अपात्र लाभार्थ्यांसाठी चुकीचा पंचनामा

Bhairav Diwase

ग्रामपंचायत अधिकारी खुशाब मानपल्लीवार निलंबित!

चंद्रपूर:- नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यात मोठा गैरव्यवहार केल्याप्रकरणी खुशाब व्येकाजी मानपल्लीवार ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत घाटकूळ यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मानपल्लीवार हे ग्रामपंचायत घाटकुळ, पंचायत समिती पोंभुर्णा येथे कार्यरत होते.


नेमका काय आहे प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, खुशाब मानपल्लीवार यांना दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी मौजा घाटकुळ येथे चुकीचे पंचनामे सादर केले. या चुकीच्या पंचनाम्यामुळे, ज्या 9 लाभार्थ्यांच्या नावावर सात-बारा नव्हता, अशा अपात्र लोकांना शासनाकडून एकूण ४ लाख १८ हजार ६९० रुपये इतके अनुदान वितरित झाले.


शिस्तभंगाची कारवाई:


या प्रकरणाच्या चौकशी अहवालावरून खुशाब व्येकाजी मानपल्लीवार यांनी त्यांना नेमून दिलेल्या कामात आणि विहित कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे ते महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम 1964 चे नियम 6 नुसार शिस्तभंगविषयक कार्यवाहीस पात्र ठरले. या गंभीर गैरव्यवहाराची दखल घेत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), चंद्रपूर यांनी त्यांना तात्काळ प्रभावाने जि.प. सेवेतून निलंबित केले आहे.



या कालावधीत त्यांचे मुख्यालय पंचायत समिती, वरोरा येथे निश्चित करण्यात आले आहे. त्यांना मुख्यालय सोडण्यासाठी गट विकास अधिकारी, पंचायत समिती, वरोरा यांची पूर्वमंजुरी घेणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, निलंबन कालावधीत त्यांना कोणतीही खाजगी नोकरी, धंदा अथवा व्यापार करता येणार नाही. याचे उल्लंघन केल्यास, ते गैरवर्तणुकीचे कृत्य मानले जाईल आणि त्यांच्यावर आणखी दोषारोप ठेवला जाईल. यासाठी त्यांना दर महिन्याला प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.