ओबीसी बांधवांनी 26 नोव्हेंबरच्या मोर्चात सहभागी व्हावे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आवाहन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Nov 24, 2020
चंद्रपूर:- ओबीसी जनगणना समन्वय समिती चंद्रपूर च्या वतीने ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी चंद्रपूर येथे संविधान दिनी 26 नोव्हेंबर 2020 ला सकाळी 11 वाजता ओबीसी महामोर्चा चे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोर्चात विदर्भातील तसेच गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तसेच ओबीसी मधील इतर संघटनांनी व जात संघटनांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, कार्याध्यक्ष विनायक बांदूरकर, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर सचिव प्रा. देवानंद कामडी इत्यादींनी केलेले आहे.
               ओबीसी समाज हा बारा बलुतेदार व 18 अलुतेदार यांचा समूह आहे. हातात नानाविध कौशल्य व अंगमेहनतीची तयारी असलेला हा समाज 3 743 जातीत विभागला गेलेला आहे. राष्ट्रीय जनगणना 2021 मध्ये ओबीसी समुदायाची जातिनिहाय जनगणना झाल्यास त्यातून ओबीसींच्या समकालीन जीवनमानाचे स्वरूप समजू शकेल, त्या माहितीच्या आधारे ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी योजना व धोरणे आखताना येईल, देशा च्या अर्थसंकल्पात त्यासाठी स्वतंत्र तरतूद करता येईल. लोकसंख्येत निम्म्यापेक्षा जास्त असलेल्या या निर्माण करत्या समाजाला विकासापासून वंचित ठेवून चालणार नाही मागासवर्गीयांचा विकास झाल्याशिवाय भारत महासत्ता होणार नाही, हे निर्विवाद सत्य असतानासुद्धा देशातील सरकारे ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यास टाळाटाळ करतात. आणि म्हणूनच केंद्र सरकार ला 2021 मध्ये ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यास बाध्य करण्यासाठी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने 26 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या ओबीसी महामोर्चात सामील व्हावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
   
 प्रा. शेषराव येलेकर
    उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ