यालाच म्हणतात एकीचे बळ..... लाॅकडाऊनमध्ये गावाकङे परतलेल्या तरुणांनी साकारली अभ्यासिका.

Bhairav Diwase
सावली तालुक्यातील मेहा बुज येथील तरुणांचा आदर्शवत उपक्रम.
Bhairav Diwase. Nov 29, 2020

चंद्रपूर:- गेल्या काही वर्षात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सावली तालुक्यातील मेहा बुज. गावातील विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली. पण, शिक्षणासाठी मोठ्या शहरात जावे लागले. मात्र, यंदा कोरोना काळातील लाॅकङाऊनमुळे मुलांना गावाकङे परतावे लागले. अशावेळी अभ्यासाची चिंता सतावत होती. समविचारी तरुण एकत्रित आले आणि अभ्यासिकेचा संकल्प पुढे आला. लाॅकङाऊनमधल्या वेळेत तरुणांनी श्रमदान केले. काहींनी अर्थदान केले. या तरुणांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अभ्यासिका केंद्र साकारले. आता शाळा-महाविद्यालये बंद असल्याने कोरोनाचे सर्व नियम पाळून सामाजिक अंतर राखत अभ्यास सुरू केला आहे.



 सावली तालुक्यातील मेहा बुजरुक हे छोटेसे गाव. गावात सातवीपर्यंत शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेची व्यवस्था आहे. पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थी अंतरगाव, निफंद्रा, विहिरगाव किंवा पाथरीला जातात. पण, इथेही बारावीनंतरच्या शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे गावातील अनेक तरुण चंद्रपूर किंवा अन्य शहरात गेलीत. काहीजण स्पर्धा परिक्षांची तयारी करीत आहेत. 
गावात ग्रंथालय किंवा अभ्यासिका नसल्याने गरजू आणि होतकरु विद्याथ्र्यांना अभ्यास करण्यासाठी बाहेरगावी राहावे लागत आहे. यंदा मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी गावाकडे परतलीत. नोकरी करणारेही घरी आलेत. आज ना उद्या लाॅकङाऊन उठेल आणि आपण परत जाऊ, अशी आशा सर्वांना होती. पण महिना-दोन महिने निघून गेल्यानंतरही कोरोनाचा प्रभाव कमी होऊ शकला नाही. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाची चिंता सतावत होती. गावात परत आलेले सर्व विद्यार्थी, तरुण कङक लाॅकङाऊन मुळे एकमेकांना भेटू शकत नव्हती. अशा वेळी चर्चा करणेही कठीण होत होते. अशातच व्हाट्सअप ग्रुपची निर्मिती करण्यात आली. यातून एकमेकांशी संवाद होऊ लागला. एके दिवशी अभ्यासिकेचा विषय चर्चेतून पुढे आला. पण ती साकारायची कशी हा प्रश्न सर्वांपुढे होता. ग्रंथालय व अभ्यासिकेची व्यवस्था झाल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची गोडी विद्याथ्र्यांमध्ये निर्माण होईल. अभ्यासिका केंद्रात गरिब आणि ज्यांच्याकडे सुविधा नाही, अशांनाही अभ्यासाची व्यवस्था होईल. जेणेकरुन गावातील मुलांना अभ्यास, स्पर्धा परिक्षा आणि नोकरीसाठी तयारी करण्याची संधी मिळेल, अशी विनंती तरुणांनी ग्रामपंचायतीकङे केली. त्याला सुमारे 300 पालकांनी पाठिंबा दिला. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या शेजारी बंद पङलेल्या जागेत या अभ्यासिका केंद्र सुरू करण्यावर एकमत झाले. पण कायदेशीर बाबींचीही काही अडचणी होत्या. मात्र ग्रामपंचायत कमिटी आणि पंचायत समितीच्या सभापतींनी यात सहकार्य करून हा मुद्दा तडीस नेण्यासाठी मार्गदर्शन केले पाठिंबा दिला. जागा उपलब्ध झाली असली तरी आर्थिक बाब कुठून पुर्ण करायची हा प्रश्न सर्वांकडे होता. नोकरी करणार्‍या तरुणांनी पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनीही जमेल तशी रक्कम मिळविली. काहीतरी नवीन उपक्रम होत असल्याची खबर मित्रांना मार्फत बाहेर पसरू लागली. भविष्यासाठी स्तुत्य असा उपक्रम बघून अनेकांनी मदतीचे हात पुढे केलेत. सिमेंट रेती आणि अन्य साहित्य देखील खरेदीसाठी सुरुवात झाली. पडक्या जागेतील बांधकाम आणि डागडुजीसाठी मजुरांची गरज होती. तो खर्च परवडणारा नव्हता. तेव्हा गावातील हे विद्यार्थी श्रमदान करण्यास पुढे आलेत. हातात कुदळ, पावडे, सब्बल, कुऱ्हाड, घमेला आधी साहित्य घेतले. बघता-बघता कार्य पूर्ण सिद्धीस गेले. विद्यार्थ्यांना आरामात बसून वाचन करण्याची सुविधा झाली. शिवाय पुस्तकांचा अद्ययावत संग्रह उपलब्ध झाला. आणखी महत्त्वपूर्ण आणि अभ्यासाच्या पुस्तकांचे तजवीज करणे सुरूच आहे. गावातील शैक्षणिक चेहरामोहोरा बदलण्यासाठी उचललेला हा वीङा स्तुत्य असून, एकीचे बळ दर्शविणारा आहे. 
भविष्यात ई-लायब्ररी राहणार असून, तज्ज्ञांकडून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी समुपदेशनही केले जाणार आहे.