मूल:- नगर परिषदेच्या नवीन इमारतीला रंग मारताना झुल्यावरून पडून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १९) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गुजरी चौकात घडली. पंकज प्रभाकर खोबरागडे (वय ३२) असे मृत युवकाचे नाव आहे. येथील गुजरी चौकात नगर परिषदेची जुनी इमारत आहे. या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तीन माळे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रंगरंगोटीचे काम सुरू आहे. पंकज खोबरागडे हा सकाळच्या सुमारास दोरीच्या झुल्यावर बसून तिसऱ्या माळ्यावर रंग मारत होता. अचानकपणे दोर तुटला आणि झुल्यासह पंकज जमिनीवर कोसळला. यात गंभीर जखमी झालेल्या पंकजला कंत्राटदाराने उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूरला खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पण कोणतीही सुधारणा होत नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला .