"मी तुमच्या बापाचा नोकर नाही" असे उर्मटपणे बोलणाऱ्या तलाठ्याला त्वरित निलंबित करण्याची गावकऱ्यांची मागणी. #Gondpipari

Bhairav Diwase

वढोलीतील जनता सोमवारपासून करणार तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गोंडपिपरी:- विविध विभागाचा आढावा घेण्याकरिता ग्रामपंचायत वढोली येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली. महसूल विभागाची वेळ आली तेव्हा नागरिकांनी तलाठ्यावर ताशेरे ओढले. शेतकरी बांधवांना कामासाठी दिवसेंदिवस ताटकळत ठेवणे, कामासाठी दलाल नेमून शेतकऱ्यांकडून पैसे घेणे, पुरबुडी व अतिवृष्टीच्या मदतीची रक्कम देण्याकरिता पैसे घेणे, दाखल्यांसाठी पैसे घेणे, कामासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावयास लावणे, यामुळे नागरिक संतप्त झाले. यावर सरपंचांनी जाब विचारला असता तलाठ्यांनी सरपंचाला "मी तुमच्या बापाचा नोकर नाही" असे उर्मटपणे बोलले. या सगळ्या प्रकारांनतर तलाठी जनार्धन बल्की यांच्यावर तातडीने कार्यवाही करण्याची गावकऱ्यांनी ग्रामसभेत मागणी केली. ग्रामसभेचा ठराव घेत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

निवेदनाची तात्काळ दखल घेऊन त्यांचेवर ७ दिवसाचे आत निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी व वढोली साजा १० तुन त्वरीत हकालपट्टी करण्यात यावी. ७ दिवसात निलंबनाची कार्यवाही न झाल्यास ८ व्या दिवसापासून तहसिल कार्यालय, गोंडपिपरीच्या समोर सर्व ग्रा. पं. पदाधिकारी व सदस्य तथा ग्रामस्थासोबत बेमुदत उपोषण करण्यात येईल. व याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा ग्रामपंचायत चे सरपंच राजेश वासुदेवराव कवठे यांनी दिला होता.

मात्र निवेदनाची प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली नसल्याने सोमवारपासून तहसिल कार्यालयासमोर वढोलीतील जनता आमरण उपोषण करणार आहेत. असेही सरपंच राजेश कवठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला सरपंच राजेश कवठे, संदीप लाटकर,संदीप पौरकार, राहूल सोनटक्के, तंटामुक्त समिती अध्यक्ष शामराव सोनटक्के यांची उपस्थिती होती.