तीन तासाच्या थरारानंतर घरात घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद #Leopard

Bhairav Diwase
सावली:- संरक्षण भिंत ओलांडून बिबट्या चक्क घरात घुसल्याची घटना चंद्रपूर मधील सावली वनपरिक्षेत्रात येणाऱ्या पाथरी येथे आज (गुरुवार) पहाटे घडली. दरम्यान, सावली येथील विभागाच्या चमूने तीन तास रेस्क्यू ऑपरेशन करून त्या बिबट्याला जेरबंद केले.
पाथरी येथील गोपाळ पाटील ठीकरे यांच्या घरामागे मोठे जंगल आहे. गुरुवारी त्यांचे कुटुंबीय गाढ झोपेत असताना अचानक बिबट्याने घरात प्रवेश केला. घरात बिबट घुसल्याची माहिती होताच मोठी तारांबळ उडाली. बिबट्या घरात घुसल्याची बाब गावात वाऱ्यासारखी पसरली. बिबट्याला बघण्यासाठी गावातील लोकांनी गर्दी केली.
 दरम्यान, सावली येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना तसेच पाथरी पोलीस स्टेशनच्या पथकाला याबाबत माहिती देण्यात आली. दरबान पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश मोहोळ व सावली येथील वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी कांबळी व त्यांची चमू ठिकरे यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी घरातील सर्व मार्ग बंद करून एका मार्गावर पिंजरा लावून रेस्क्यू ऑपरेशन केले. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबटला जेरबंद करण्यात यश आले.
यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी कांबळी, डीएमओ प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर पुचडवार, सावली येथील व्याघ्र दलाचे, वन्यजीव संरक्षक उमेश झिरे उपस्थित होते.