घुग्घूसमधील पुन्हा चार घरांना भेगा; ५६ कुटुंबांना हलविले #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घुग्घूस येथे गजानन मडावी यांचे घर शंभर फुट खोल जमिनीत गाडल्याची दुर्घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा रात्रीच्या सुमारास चार घरांना तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. शनिवारी (दि.२८) या संपूर्ण घटनेची पाहणी करून लवकरच जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन या घटनेचे कारण शोधण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे.
शुक्रवारी (दि.२७) बैळपोळ्याची जय्यत तयारी सर्वत्र सुरू असताना चंद्रपूर तालुक्यातील घुग्घूस शहरातील आमराई वार्डात धक्कादायक घटना घडली. गजानन मडावी यांचे घर सर्वप्रथम हलायला लागले. मडावी कुटूंबिय घाबरल्याने ते घराबाहेर पडले. काही क्षणात मातीचे अख्‌खे घर सुमारे शंभर फुट जमिनीत गाडले गेले. या घटनेने आमराई वार्डात नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. प्रशासनाने भविष्यातील धोका लक्षात घेता रात्रीच १३ कुटूंबियांना अन्य ठिकाणी हलविले. तसेच काही कुटूंबियांना सुरक्षिततेकरीता अन्य ठिकाणी आश्रय घेण्याच्या सुचना दिल्या.
शनिवारी सकाळी दिवसभर ४३ कुटूंबियांना स्थलांतरीत केले आहे. आतापर्यंत तब्बल ५६ कुटूंबियांना हलविण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या सर्व कुटूंबियांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. मडावी यांचे घर जमिनीत गाडल्या गेल्यांनतर पुन्हा रात्रीच्या सुमारास चार घरांना भेगा पडल्या आहेत. मडावी यांचे घर जमिनीत गाडल्या गेल्याने चारही कुटूंबियांनी रात्रीच घर खाली केले होते. आज सकाळी घरांचे निरीक्षण केल्यानंतर चार घरांन भेगा आढळून आल्या आहेत. त्यामुळे घटनास्थळापासून शंभर मीटर परिसरातील सर्व घरे खाली करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
तहसीलदार निलेश गौड यांनी, शनिवारी सकाळी आमराई वार्डातील या घटनेची संपूर्ण पहाणी करून पोलीस बंदोबस्त तैनात केला. या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. शुक्रवारी रात्रीपासून महसूल व पोलीस प्रशासन येथे तळ ठोकून असून घटनेची पुनरावृत्ती होवू नये याकरिता काळजी घेत आहेत. या घटनेची पहाणी केल्यांनतर तहसीलदारांनी वेकोली प्रशासनासोबत बैठक घेऊन या घटनेचे मुळ कारण शोधणार असल्याचे सांगितले.