Top News

लंडन...... भारावणारे शहर आणि बाबासाहेबांची प्रेरणा:- ॲड. दीपक चटप #chandrapur


लंडन शहर भारावून टाकणारे आहे. एका स्वप्ननगरीत आल्याचा भास होतो. मी पहिल्यांदाच भारताबाहेर आलो आहे. इथे पोहचल्यानंतर मेट्रोने प्रवास करतांना, रस्त्याने चालतांना आणि शहरात वावरतांना एक बाब विशेषत्वाने आवडली, ती म्हणजे इथली शिस्त. सिग्नलला वाहने थांबतात तेव्हा दोन वाहनात दोन-तीन फुटांचे अंतर असते. दुकानात काउंटर समोर एका ओळीने रांगेत ग्राहक उभे असतात. मेट्रो स्टेशनला टुब रेल आली की, आधी ज्या प्रवाशांना खाली उतरायचे त्यांना उतरु दिल्या जाते. त्यानंतर क्रमाक्रमाने कोणतीही धक्काबुक्की न करता अत्यंत शिस्तीने प्रवासी मेट्रोत चढतात. एखादी वयोवृद्ध व्यक्ती उभी दिसली तर लोक स्वत:हून उभे राहून त्यांना जागा देतात. कोणीही कचरापेटी व्यतिरिक्त इतरत्र कचरा फेकताना मला दिसले नाही. लंडनला पुढील वर्षभर माझे वास्तव्य वुड ग्रीन स्टेशनलगत आहे. वेळोवेळी येणारे अनुभव तुमच्याशी शेअर करत राहील.
लंडनला पोहोचल्यानंतर ज्या पहिल्या ऐतिहासिक वास्तूस भेट दिली, ते म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर. कँमडेन भागातील चाल्क फार्म स्टेशन जवळ असलेल्या किंग्ज हेनरी मार्गावर लंडन येथे शिकायला असतांना बाबासाहेबांचे वास्तव्य होते. १९२१-२२ साली बाबासाहेब तिथे राहिले. “वेटिंग फार व्हिसा” हे त्यांचे पुस्तक वाचल्यानंतर मी प्रचंड रडलो. इतक्या कठीण परिस्थितीत भारतात अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागत असतांना हताश न होता त्यांनी त्याकाळी गाठलेली ही मजल मला नेहमी प्रेरणा देणारी होती व असेल. म्हणूनच लंडनला आल्यानंतर तिथे पहिली भेट देऊन इथला पुढचा प्रवास नव्या ऊर्जेने सुरु केला आहे.
बाबासाहेबांच्या लंडन येथील घरी गेल्यानंतर त्यांचा चश्मा, पेन, लिहिलेली पत्रे, महत्वाचे फ़ोटोज बघितले. लंडन येथून शिकून गेल्यानंतर बाबासाहेबांनी दुर्बल घटकातील काही युवकांना परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्यासोबतचा बाबासाहेबांचा एक फोटो तिथे दिसला. माझ्या चंद्रपूरचे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे साहेब देखील त्या फोटोत आहे. एकंदरित आपल्यासोबत इतरांना पुढे घेऊन जाणारे माणसं समुद्रासारखे प्रवाही, विशाल होतात. अपमान, अवहेलना सहन करुन प्रवास सुरु ठेवतात. लंडनला विधी शाखेचे शिक्षण घेऊन वंचित घटकांची कोर्टात प्रभावी बाजू मांडणारे निष्णात अधिवक्ता असलेले बाबासाहेब हे केवळ कोर्टापुरते मर्यादित न राहता लेखनी हातात घेतात. राउंड टेबल conferences, सत्याग्रही आंदोलने व धोरणात्मक कार्यही करतात. त्यांचे जगणे समकालीन व भावी पिढींना दिशा देऊन जाते. त्याकाळातील महत्वाचे राजकीय नेते व समाजसुधारक यांच्यासोबत असलेले फोटोज बघून भारावून गेलो. चालता - बोलता दैदिप्यमान इतिहास डोळ्यासमोर तरंगत होता. जिथे बाबासाहेब वावरले, 'प्रोब्लेम ऑफ इंडियन रूपीज' या प्रबंधाचे विचारमंथन केले; ती वास्तू फिरुन झाल्यानंतर जातांना बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. १०० वर्षाआधी बाबासाहेब या शहरात आल्यानंतर इथल्या गोडगुलाबी थंड हवेत रमले नाही. हे शहर भुरळ घालणारे, प्रेमात पाडणारे आहे. लंडन येथील उच्चशिक्षणाचा फ़ायदा भारतातील दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी व्हावा, म्हणून बाबासाहेब भारतात परतले. ही वाट जरी खाचखडग्यांची आणि संघर्षाची असली तरी बाबासाहेबांची प्रेरणा सोबत असल्याने प्रचंड आत्मिक बळ मिळाले आहे.

ॲड. दीपक चटप,
२६.०९.२०२२ (लंडन)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने