Top News

आम्ही कधी होणार प्रदूषणापासून मुक्त #chañdrapur #Korpana #Gadchandur


माणिकगडच्या प्रदूषणाने नागरिकांचा जीव गुदमरतो



कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना येथील गडचांदूर शहर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रदुषणाच्या विळख्यात सापडले आहे. तालुक्यात 4 आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिमेंट उद्योग आहे. याच श्रेणीत गडचांदूर शहराच्या मधोमध माणिकगड सिमेंट कंपनी मोठ्या डौलाने उभी आहे.
ज्यावेळी हा उद्योग शहरात आला. त्यावेळी येथील भोळ्याभाबड्या शहरवासीयांना वाटले की, मुलांना नोकऱ्या लागतील, शहराचा भरभरून विकास होईल. मात्र हे सारे "बोलाची कढी आणि बोलाचाच भात" अशी अवस्था झाली असून नागरिकांनी बघितलेल्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या उद्योगामुळे शहरवासीयांना दुसरे काही नाही पण प्रदुषणाची भेट बेदरकारपणे मिळत आहे.

माणिकगड कंपनीच्या कणीयुक्त वायू प्रदूषणामुळे शहरातील कित्येक नागरिकांना श्वासाचे आजार झाले आणि सतत होत आहे. कित्येक आंदोलने झाली, कित्येकदा जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदने देण्यात आली. मात्र संबंधीत विभाग कारवाई करायला तयारच नाही.! प्रत्येकवेळी निव्वळ आश्वासनाचे डोस पाजले जात असून प्रदूषणाच्या विषयावर "खाल पासून वरपर्यंत सर्व काही ओक्के" असल्याचे आरोप होत आहे.

कंपनीच्या प्रदूषण विरोधात मागील काळात बरीच आंदोलने झाली. याच श्रेणीत काही महिन्यापूर्वी मोठ्या तावातावाने पुन्हा आंदोलन उभे करण्यात आले."प्रदुषण नियंत्रण कृती समिती" तयार करण्यात आली. प्रदूषणा संदर्भात सोशल मिडीयावर मोठमोठ्या योजना आखण्यात आल्या. हस्ताक्षर मोहीम, पत्रव्यवहार अशा गोष्टी वगळता समाधानकारक मात्र काहीच घडले नाही. हळूहळू यालाही पूर्णविराम मिळाला आणि कृती समितीचे आंदोलन अचानकपणे अदृश्य झाले? परिणामी आजही प्रदूषण जैसे थे असून "त्या प्रदूषण कृती समितीचा शोध लागेना" अशी उपहासात्मक चर्चा शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे. याविषयी उलटसुलट चर्चांना कमालीचे उधाण आले असून "आम्ही कधी होणार प्रदूषणापासून मुक्त" अशी विचारणा आता केली जात आहे.

कंपनीच्या डस्टमुळे दिवसेंदिवस निष्पाप नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असताना संबंधित विभाग पाठोपाठ लोकप्रतिनिधींनी सुध्दा जनतेच्या या जीवघेण्या समस्येकडे डोळेझाक केल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे. इतके आंदोलन झाले. आता आंदोलनाचा विचार केला तर अंगावर शहारे येतात अशी जळजळीत भावना व्यक्त होत आहे. गडचांदूरकरांची या नरकयातनेतून कधीही सुटका होणार नाही? असे म्हटले तर वावगे ठरणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने