भद्रावती:- प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या शेतात केलेल्या लागवडीसाठी अमेरिकन डॉलर सोयाबीनचे भरघोस पीक देणार असून इतर शेतकऱ्यांसाठी ते आदर्श ठरणार आहे.
भद्रावती तालुक्यातील मांगली (रै.) येथील विठ्ठल विधाते हेच ते प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांनी मांगली या गावापासून २ कि.मी. अंतरावर जंगलालगत असलेल्या आपल्या दीड एकर शेतात दि.१० डिसेंबर रोजी 'अमेरिकन डॉलर' वाणाच्या सोयाबीन बियाणाची पेरणी केली. आज या ठिकाणी ४ फूट उंचीची अनेक हिरवीगार झाडे डौलाने उभी आहेत. या झाडांना भरपूर शेंगा लागल्या आहेत. डिसेंबर महिन्यात पेरलेल्या अमेरिकन डॉलरचे पीक मार्च अखेर हातात येणार आहे. विधाते यांनी या बियाणाची पेरणी करण्याकरिता नजिकच्या बोरगांव येथून १५० रुपये किलो प्रमाणे बियाणाची खरेदी केली. या पिकाला पाणी देण्याकरिता शेतातील बोअरवेलची व्यवस्था करण्यात आली आहे. या पिकावर आतापर्यंत दोनदा बुरशीनाशक तननाशक औषध फवारण्यात आले. आता कोराजन हे औषध फवारण्यात येणार आहे. सामान्यपणे सोयाबीन हे खरीप हंगामात घेतले जाणारे नगदी पीक आहे. उन्हाळी पीक म्हणून सहसा कोणी घेत नाही. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे उगवण क्षमता जास्त असते. तसेच कृषी केंद्रात बियाणे विक्रीसाठी त्याचा वापर केला जातो.
विधाते यांच्या शेतात ज्या जागेत अमेरिकन डॉलर डौलाने उभे आहे. त्याच जागेत खरीप हंगामात 'करिश्मा' वाणाच्या सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. परंतु पावसाच्या लहरीपणामुळे केवळ १५ पोते उत्पन्न मिळाले. मात्र याच जागेत अमेरिकन डॉलर सोयाबीनचे भरघोस उत्पादन देईल अशी विधाते यांना आशा आहे. बिजाई म्हणून विकण्याकरिता त्यांनी या पिकाची या हंगामासाठी निवड केली. कृषी अधिकारी यांनी या शेतास भेट देऊन मार्गदर्शन केल्यास आणखी भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होईल. भद्रावती येथील नगर परिषदेत कर्मचारी असलेले विधाते यांना शेती व्यवसायात रुची आहे. त्यामुळे ते आपल्या शेतात विविध प्रकारचे प्रयोग करतात. याकामी त्यांचा मुलगा शुभम त्यांना खूप मदत करतो. विधाते यांनी या शेतात हरभरा आणि गहू या पिकांची लागवड केली आहे. तीही पिके चांगली आहेत. मागील वर्षी भाजीपाल्याचेही उत्पादन भरघोस झाले होते. जंगलाच्या कडेला शेत असल्याने जंगली प्राण्यांचा हैदोस असतो. परंतु विधाते यांच्या पिकांना या प्राण्यांचा उपद्रव होत नाही. याला कारणही तसेच आहे.
विधाते यांनी एक नामी शक्कल लढवली. त्यांनी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला रोखण्यासाठी शेतात माऱ्यावर एक भोंगा लावला. या भोंग्यावर दिवसरात्र गाणी वाजवली जातात. विशेषतः रात्रीच्या वेळी वाघाची डरकाळी किंवा कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आणि इतर प्राण्यांचे आवाज ऐकविले जातात. त्यामुळे कोणतेही जंगली प्राणी शेतात येत नाही. शिवाय पिकांच्याभोवती आवाज करणारी पट्टी लावण्यात आली आहे. हवा आल्यास या पट्टीचा फडफड असा आवाज होतो व रानडुकरासारखे प्राणी पळून जातात. अशा प्रकारे कोणत्याही प्राण्याला इजा न होता पिकाचे संरक्षण केले जाते. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी विधाते यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत