डॉ. परशुराम खुणे यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- डॉ.परशुराम कोमाजी खुणे हे आदिवासी आणि नक्षल भागातल्या असामान्य कार्यासाठी ओळखले जातात. गेली 50 वर्षे ते झाडीपट्टी रंगभूमीवर नाट्यकलावंत (नाट्य अभिनेते) म्हणून काम करत असून 800 लोक कला प्रकारात आणि नाटकातून त्यांनी सुमारे 5,000हून अधिक अशा विविध भूमिका साकारल्या आहेत.

महाराष्ट्रातील वनक्षेत्र आणि आदिवासी भागातील गुरनोली या लहानश्या खेड्यात 22 फेब्रुवारी 1952 ला जन्मलेल्या डॉ. खुणे यांचे प्राथमिक शिक्षण गुरनोली इथल्या जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण झाले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातल्या नवरगाव इथून त्यांनी माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेतले. होमिओपॅथी मेडिसिन अ‍ॅन्ड सर्जरी (डी.एच.एम.एस) ची पदविका त्यांनी नागपूर मधून घेतली.

डॉ. खुणे यांनी, गुरनोली ग्रामपंचायत सरपंच म्हणून 10 वर्षे काम केले. आदिवासी आणि मागास राहिलेल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अंधश्रद्धा, जाचक जुन्या रिती आणि परंपरा यांचे बळी ठरणाऱ्या अशिक्षित लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी कार्य केले. त्यांचे जीवन आणि त्यांच्या भूमिका यांचा प्रभाव आगळाच आहे. नाटकाच्या अनुषंगाने त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक जण त्यांच्या कौशल्याने प्रभावित होतो. अनेक युवक त्यांच्या कार्यापासुन स्फूर्ती घेत आत्मनिर्भर झाले आहेत. ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनसाठीही त्यांनी काम केले. पूर्व वैदर्भीय आणि आदिवासी समाजाचा ते आदर्श ठरले आहेत.

कृषी क्षेत्रातल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी महाराष्ट्र सरकारच्या शेतीनिष्ठ पुरस्काराने त्यांना 1991 या वर्षी गौरवण्यात आले. 1993 मध्ये त्यांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मानव मंदिर नागपूर द्वारे त्यांना 1996 मध्ये स्मिता पाटील स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाट्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यांना 2012 मध्ये कला दान पुरस्कार प्रदान केला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)