गडचिरोली:- जिल्हा पोलिस दलातील अत्यंत महत्त्वाच्या सी-६० या नक्षलविरोधी पथकातील एक जवानाचा तलावात बुडाला हाेता. २४ तासानंतर त्याचा मृतदेह ५ एप्रिलरोजी तलावातील पाण्यावर तरंगताना आढळला. ही घटना चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे घडली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
आकाश मुन्सी लेकामी (वय ३०, रा. पिपरी ता. एटापल्ली )असे मृत जवानाचे नाव आहे. आकाश लेकामी हे जिल्हा पोलिस दलाच्या सी ६० या नक्षलविरोधी अभियान पथकात कार्यरत होते. पत्नी माहेरी असल्याने ते ४ एप्रिल रोजी एक दिवसाची सुटी घेऊन सासरवाडीत अडंगेपल्ली येथे गेले होते. रेगडी येथील कन्नमवार तलावात ते ४ एप्रिलला दुपारी तीन वाजता पोहाेण्यासाठी एकटेच गेले. यावेळी त्यांनी पाण्यात उडी घेतली, पण त्यानंतर वर आलेच नाही.
इकडे नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. ५ एप्रिलला त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. रेगडी पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक कल्पेश मगरे तपास करत आहेत. या जवानाचा मृत्यू नेमका कसा झाला? घातपात कि अपघात? हे उत्तरीय तपासणी अहवालात स्पष्ट होईल. याशिवाय सर्व बाजूंनी तपास सुरु आहे. नेमके कारण शोधण्याचे काम सुरु आहे.- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक गडचिरोली