चार महिन्यापासून रखडलेले निराधार योजनेचे अनुदान! #Chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
पोंभूर्णा:- इंदिरा गांधी व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विधवा, अंपग, वयोवृध्द नागरीकांना मिळणारे अनुदान एप्रिल महिन्यापासून मिळाले नसल्यामुळे वृद्ध नागरीकांचे मोठे हाल होत आहे. शासनाकडून गोरगरीबांच्या खात्यावर तात्काळ अनुदान जमा करण्याची मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आशिष कावटवार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निराधारांना अनुदान देण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना चालविल्या जातात. या योजनेंतर्गतच्या लाभार्थ्याला एक हजार पाचशे रूपये मासिक अनुदान दिले जात आहे.निराधार नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी शासनाकडून निराधार नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. निराधार व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यांच्या भरवशावर जगत असल्याने योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्यक आहे. जेणे करून त्या पैशांचा उपयोग औषधी खरेदी करण्याबरोबरच दैनंदिन गरजांवर करता येते.मात्र मागील चार महिन्यांपासून लाभार्थ्यांना मानधनच मिळाले नाही.मानधनाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होत असल्याने निराधार नागरिक सर्व प्रथम बँकेमध्ये जाऊन अनुदानाविषयी विचारणा करीत आहेत. मात्र अनुदानच जमा न झाल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. काही नागरिक तहसील कार्यालयातही विचारणा करीत आहेत. शासनाकडून अनुदान न मिळाल्याने बँकेमध्ये जमा करण्यात आले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. सतत चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने निराधार नागरिक व त्यांच्या कुटुंबिय आर्थिक अडचणीत आले आहेत. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तात्काळ मानधन देण्यात यावे अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आशिष कावटवार यांनी केली आहे.

काही लाभार्थाना फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. लाभार्थी दररोज बँकेत चकरा मारत आहेत. अनुदान जमा होण्याचा आशेने पासबुक प्रीट मारुन बँलेस चेक करीत असतात.पण या वृद्धांना घोर निराशाच मिळत आहे.वृध्दपकाळासाठी असलेली ही मदत न मिळाल्याने त्यांच्या परेशानीत वाढ होत आहे.