पोंभूर्णा:- उकाड्याने तालुक्यातील नागरिक हैराण आहेत.अश्यातच अवकाळी पावसामुळे काही दिवसापासून शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागत आहे.आता तर विज पुरवठा खंडित होण्याचा व तासनतास बत्ती गुल राहण्याचा प्रकार सध्या तालुक्यातील शहरासोबत व गावांमध्ये अत्यंत गंभीर समस्या म्हणून उद्भवत आहे.अगदी दोन दिवसांपुर्वी अठरा तास बत्ती गुल राहण्याचा विक्रम पोंभूर्णा तालुक्याने अनुभवला आहे. परिणामी, गावातील सामान्य जनतेपासून शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिक वर्ग हैराण झाले आहेत.१८ तासानंतर विज पुरवठा सुरू झाला असला तरी तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणतेही ठोस पावले उचलण्यात येत नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष पसरलेला आहे.
पोंभूर्ण्यातील वीज वितरण कंपनी सध्या चर्चेचा विषय झाली आहे. तालुक्यातील वीज वितरण यंत्रणा अतिशय जीर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या अडथळा निर्माण करतात. काही भागांत खांब मोडकळीस आलेले असून, वायरिंगही अतिशय जुनी व कमकुवत आहे. त्यामुळे हवामानात थोडासा बदल झाला तरी वीज बंद होते आणि दीर्घकाळ येत नाही.थोडी हवा,थोडा पाऊस आणि बत्ती गुल अशी परिस्थिती पोंभूर्णा तालुक्याची झाली आहे. सोमवारला पोंभूर्णा व मुल परिसरात वादळी पावसाने झोडपून काढले होते. अश्यात सुशी गावानजीक एक पोल पडल्यामुळे विज पुरवठा खंडीत झाला होता. मात्र पुन्हा तो वीज पुरवठा सुरू करण्यासाठी तब्बल १८ तास लावण्याचा विक्रम विज वितरण कंपनीने केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एवढ्या उन्हाळ्यात साधारण १८ तास पोंभूर्णा तालुक्यातील सर्व जनता वीजेच्या समस्यांने हैराण होते.विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या दरम्यान फोन स्विच ऑफ करून ठेवल्याने अश्या अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.विज वितरण कंपनीच्या अश्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण,शेतकऱ्यांचे पाणीपुरवठ्यावर परिणाम, वीज नसल्यानं ऑनलाइन शिक्षण, संगणक प्रशिक्षण, पिठाच्या गिरण्या, पाणी पंप, दूध,थंडगारपाणी केंद्रे इत्यादी सेवा ठप्प पडल्या होत्या.अनेकांचे महत्वाचे कामं न झाल्याने विद्युत वितरण विभागावर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
महावितरणकडून दुर्लक्ष
या भागातील नागरिकांनी अनेक वेळा महावितरण कार्यालयात विज खंडित होण्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. मात्र, या समस्यांकडे कायमच दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही यंत्रणेची देखभाल व अद्ययावत कामे केली जात नसल्यामुळे ही अडचण कायमची झाली आहे.