सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूडचा (Bollywood) 'ही-मॅन' (He Man) सुपरस्टार, हँडसम हंक धर्मेंद्र (Dharmendra) यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू होते. तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांना साधारणतः बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून ते घरीच होते. पण, अखेर त्यांच्या जुहूतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या प्रकृती अस्वास्थापासूनच वेगवेगळ्या बातम्या माध्यमांमध्ये पसरत होत्या. अनेक अफवाही पसरलेल्या. अद्याप देओल कुटुंबीयांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आलेत.
तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा इंडस्ट्रीचा 'ही-मॅन' बनला
धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला. आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल की, त्यांचं खरं नाव केवल कृष्ण देओल होतं. पण, सिनेसृष्टीत त्यांची ओळख धर्मेंद्र अशीच होती. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात झालेला. धर्मेंद्र यांचं वडिलोपार्जित गाव लुधियानातील पखोवाल तहसीलमधील रायकोटजवळील डांगो आहे. धर्मेंद्र यांनी त्यांचं सुरुवातीचं आयुष्य सहनेवाल गावात घालवलं आणि लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलेलं. त्यांचे वडील गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते.
प्रकृती अस्वास्थामुळे बरेच दिवसांपासून प्रकृती होती नाजूक (Actor Dharmendra Death)
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अचानक बिघडल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यानंतर तब्बल 12 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. सरुवातीला उपचारांना ते प्रतिसाद देत होते. पण, नंतर त्यांची प्रकृती काहीशी नाजूक होती. त्यामुळे त्यांना ICU मधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलेलं. त्यानंतर पुन्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली, धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत, असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिलेली. तसेच, देओल कुटुंबीयांनीही, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिलेली. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून ते घरीच होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, आमिषा पटेल, रितेश देशमुख यांसारख्या स्टार्सनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतलेली. धर्मेंद्र यांची भेट घेऊन निघालेल्या सर्वच स्टार्सच्या डोळ्यांत अश्रू तराळलेले.
'विजयता फिल्म्स' प्रोडक्शन हाऊस उभारलं
1981 मध्ये, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी चित्रपट उद्योगात आपले पाय अधिक मजबूत करण्यासाठी 'विजयता फिल्म्स' हे त्यांचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. 'विजयता फिल्म्स'च्या माध्यमातून, धर्मेंद्र यांनी सर्वात आधी त्यांची दोन्ही मुलं, सनी देओल आणि बॉबी देओल यांना बॉलिवूडमध्ये आणलं. यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला चित्रपटांमध्ये संधी दिली, त्यांचा नातू करण देओल याची प्रेक्षकांना ओळख करून दिली.
धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 'शोले', 'चुपके चुपके', 'सत्यकाम', 'सीता और गीता' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं. जरी त्यांनी जगाला अखेरचा अलविदा म्हटलं असलं, तरीसुद्धा ते आज, उद्या आणि कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील.


