नवी दिल्ली:- पंतप्रधानांनी सांगितले की, “मी तुम्हाला, जिथे पहिल्यांदाच एक बस पोहोचली, अशा एका गावाबद्दल आज सांगू इच्छितो, त्या दिवसाची त्या गावातले लोक अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होते.” त्यांनी पुढे म्हटले की, जेव्हा गावात पहिल्यांदा बस आली, तेव्हा लोकांनी ढोल-नगारे वाजवून तिचं स्वागत केलं. बस पाहून लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
काटेझरी गावात पक्का रस्ता असूनही लोकांना वाहतुकीची गरज असूनही यापूर्वी कधीही तिथे बस सेवा सुरू झाली नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे हा गाव नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराने प्रभावित होता. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, “ही जागा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील असूम या गावाचे नाव काटेझरी आहे.”
काटेझरीमध्ये झालेल्या या बदलाचा आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आता या भागातील परिस्थिती वेगाने सामान्य होत आहे. नक्षलवादाविरुद्धच्या सामूहिक लढाईमुळे आता अशा दुर्गम आणि नक्षलवादग्रस्त भागांपर्यंतही मूलभूत सोयी-सुविधा पोहोचू लागल्या आहेत, हे या घटनेतून सिद्ध होते.
गावकऱ्यांनी सांगितले की, बस आल्याने त्यांचे जीवन अधिक सोपे होईल. ही बस सेवा केवळ वाहतुकीचे साधन नसून विकासाची, सुरक्षिततेची आणि सामान्य जीवनाकडे परतण्याची एक आशा घेऊन आली आहे.
दीर्घकाळापासून उपेक्षित असलेल्या या भागाला आता मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न यशस्वी होत असल्याचे हे द्योतक आहे. पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ मधील या उल्लेखाने गडचिरोली जिल्ह्यातील विकासात्मक कामांना, विशेषतः नक्षलवादविरोधी मोहिमेला आणि त्यातून सामान्य नागरिकांना मिळत असलेल्या लाभांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.