Murder News: पैशाच्या वादातून प्रियसीचा आवळला गळा

Bhairav Diwase

वर्धा:- येळाकेळी येथील लक्ष्मी मानसिंग धुर्वे (२६) या विवाहितेची प्रियकराने ढगा येथे नेत गळा आवळून खुन केला. या प्रकरणातील आरोपी दिलेश्वर वर्मा रा. येळाकेळी याला कारंजा पोलिसांनी अटक करून त्याची तीन दिवसीय पोलिस कोठडी मिळविली आहे. लक्ष्मीने पैशासाठी दिलेश्वरकडे तगादा लावल्याने आणि त्यांच्यात याच कारणावरून वाद विकोपाला गेल्याने तिचा गळा आवळून खुन केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली.

लक्ष्मीचे दोन विवाह झाले असून तिचे दुसर्‍याही पतीसोबत पटत नसल्याने ती मागील काही दिवसांपासून माहेरीच राहत होती. दिलेश्वर विवाहित असुन त्याचे लक्ष्मीसोबत प्रेम संबंध होते. घटनेच्या दिवशी हे दोघे ढगा परिसरात पोहोचले. याच ठिकाणी लक्ष्मीने खर्चासाठी पैशाची मागणी केली. अशातच दिलेश्वर व लक्ष्मी यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. याच शाब्दिक खडाजंगी दरम्यान दिलेश्वरने लक्ष्मीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खुन करून घटनास्थळावरून पोबारा केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले.

पुढील तपास कारंजाचे ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात कारंजा पोलिस करीत आहे. दिलेश्वर वर्मा याला कारंजा पोलिसांनी २४ रोजी अटक केली. २५ रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युतिवाद लक्षात घेऊन त्याची २८ मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.