Click Here...👇👇👇

Chandrapur Crime News: चंद्रपूर जिल्ह्यात रिसॉर्टमध्ये पूल पार्टीत चाकू हल्ला

Bhairav Diwase
1 minute read

चंद्रपूर:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत येणारे रिसॉर्ट पूल पार्टी आणि दारू पार्टीने चर्चेत आले आहेत. पद्मापूर येथील पोद्दार रिसॉर्टमध्ये सोमवारी सकाळी अशाच प्रकारे पूल पार्टीत तरूणांनी दारूच्या नशेत मद्यधुंद अवस्थेत रिसॉर्ट मॅनेजरवर चाकूने हल्ला केला. यात मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून दुर्गापूर पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पद्मापूर गावाजवळील पोद्दार रिसॉर्टमध्ये हि घटना सोमवारी सकाळी घडली. येथे पूल पार्टीसाठी आलेल्या तरुणांनी नशेत धुंद होऊन डीजे वाजवण्यावरून वाद करत रिसॉर्ट मॅनेजरवर चाकूने हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, घुग्घूस येथील पाच तरुण सोमवारी सकाळी सुमारास ११ वाजता पोद्दार रिसॉर्टमध्ये आले. दारूच्या नशेत झिंगणाऱ्या या तरूणांनी डीजे वाजवण्यावरून रिसॉर्ट मॅनेजरशी वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दारूच्या नशेत या मद्यधुंद तरूणांनी थेट रिसॉर्ट मॅनेजरवर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आणि तेथून फरार झाले.

जखमी मॅनेजरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांत पाचही आरोपींना भद्रावती येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ललित गाताडे, आकाश आसुटकर, विष्णू बोंगाले, करण तीर्थगिरिवार आणि कृष्णा तोगार यांचा समावेश असून हे सर्व आरोपी घुग्घूस येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.