कोरपना:- कोरपना तालुक्यातील सावलहिरा गावातून एका अत्यंत दुःखद घटनेची बातमी समोर आली आहे. विजेचा धक्का लागून एका १८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
बुधवारी, २५ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोरपना तालुक्यातील सावलहिरा गावात ही हृदयद्रावक घटना घडली. आनंद प्रफुल जोगी, वय १८ वर्षे, या युवकाचा तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आनंद हा प्रफुल जोगी यांचा एकुलता एक मुलगा होता. प्रफुल जोगी यांनी जगदीश धोटे यांच्या मालकीचे शेत ठेकेदारी पद्धतीने घेतले होते. मंगळवारी झालेल्या वादळामुळे या शेतात एक विद्युत खांब पडला होता आणि विजेच्या तारा लोंबकळत होत्या.
बुधवारी सकाळी ११ वाजता आनंद टीबन्याच्या कामासाठी शेतात गेला. मंगळवारी वादळामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असावा असे गृहीत धरून त्याने आपले काम सुरू केले. मात्र, दुर्दैवाने त्याचवेळी तुटलेल्या विद्युत तारेला त्याचा स्पर्श झाला आणि त्याला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ पोलीस यंत्रणेला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि त्यानंतर मृतदेह कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
या प्रकरणाचा पुढील तपास कोरपना पोलीस करत आहेत. एका तरुण मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने सावलहिरा गावावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.