मुख्यमंत्र्यांकडून आशीर्वाद, पोलीस बनले वऱ्हाडी
गडचिरोली:- गडचिरोलीतील नक्षलवादी लग्नाआधीच चांगल्या मार्गावर आले असून त्यांनी आत्मसर्पण केलं आहे. या आत्मसमर्पण केलेल्या 13 नक्षल युवक-युवतींचा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात आणि पोलिसांच्या साक्षीने संपन्न होत आहे. विशेष म्हणजे गडचिरोली पोलीस मुख्यालयात चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे शुभ मंगल सावधान म्हणत अक्षता पडणार आहेत.
गडचिरोली पोलीस दलातर्फे आत्मसमर्पित नक्षलवादी युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा लग्नसोहळा संपन्न होत आहे. जवळपास 13 आत्मसमर्पित नक्षल युवक युवती या विवाह सोहळ्यातून लग्न बंधनात अडकणार आहेत. तत्पूर्वी गडचिरोली पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे पोलीस मुख्यालय परिसरातून वर-वधुंची वाजत जागत वरात काढण्यात आली. या वरातीत पोलीस कर्मचारी वऱ्हाडी बनवून सहभागी झाले होते. विवाह बंधनात अडकणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नक्षली गिरीधरसह नक्षल युवक-युवतींनी या लग्न सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
वर्षानुवर्षे घनदाट जंगलात बंदुकीच्या जोरावर क्रांती घडवू पाहणाऱ्या अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाची वाट धरली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात विकासाची नवीन पहाट उजाडली आहे. गडचिरोली पोलिसांनी या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची रेशीमगाठ जुळवून आणली असून आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्म समर्पित नक्षलवाद्यांचा सामूहिक विवाह सोहळा गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालयात पार पडत आहे. पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू अलाम सभागृहात हा विवाह सोहळा संपन्न होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह गणमान्य नागरिक उपस्थित राहणार आहेत. नव विवाहित नक्षल दांपत्यांना मुख्यमंत्री स्वतः शुभ आशीर्वाद देणार असून विविध साहित्याचे वाटपही करणार आहेत.