Surrender of 12 Maoists: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १२ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

Bhairav Diwase

गडचिरोली:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म.रा. देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री गडचिरोली जिल्हा (वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, कायदा आणि न्याय, कामगार) ॲड. आशिष जयस्वाल यांचा गडचिरोली जिल्हा दौरा आज दिनांक ०६/०६/२०२५ रोजी पार पडला.

शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण ७०४ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

आज दिनांक ०६/०६/२०२५ रोजी बारा वरिष्ठ जहाल माओवादी नामे १) सपना ऊर्फ सपनाक्का ऊर्फ स्वप्ना ऊर्फ पापक्का बुचय्या चौधरी (डिव्हीसीएम, इंद्रावती एरीया) वय ५५ वर्षे, रा. वेलगूर तह. अहेरी, जि. गडचिरोली, २) रामदास ऊर्फ झिटकुराम ऊर्फ चिन्नाजी ऊर्फ सोमाजी ऊर्फ रामजी मटकुवरसिंग हलामी, (डिव्हीसीएम, कुतुल एरीया कमिटी (कृषी विभाग)), वय ५५ वर्ष, रा. कवडीकसा, तह. धानोरा, जि. गडचिरोली, ३) शिवलाल ऊर्फ सुकलु सनकु पदा (डिव्हीसीएम, कुतुल दलम (कृषी विभाग)), वय ६० वर्ष, रा. गुर्रेकसा, तह, धानोरा, जि. गडचिरोली, ४) पुष्पा ऊर्फ शामबत्ती नांगसाय होळी (डिव्हीसीएम, कुतुल एरीया कमिटी (कृषी विभाग)) वय ५५ वर्षे, रा. गुर्रेकसा तह. धानोरा, जि. गडचिरोली, ५) कोसा कुम्मा गोटा (कमांडर, कुतुल दलम), वय ३५ वर्षे, रा. कस्तुरमेट्टा, तह. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.), ६) दुर्गी ऊर्फ रम्मी चिन्ना विडपी, (उप- कमांडर, अहेरी दलम) वय ३५ वर्षे, रा. होडरी, तह. भामरागड, जि. गडचिरोली, ७) अजय ऊर्फ भीमा सोमडू मुचाकी (उप-कमांडर, राही दलम) वय २७ वर्षे, रा. भुसापूर, पोस्ट उसुर, तह. मारुबाक, जि. बीजापूर (छ.ग.), ८) संगिता ऊर्फ मसरी दोगे आत्राम (एसीएम, सप्लाय टिम), वय ४० वर्ष, रा. रामय्यापेठा, ता. अहेरी, जि. गडचिरोली ९) सविता ऊर्फ सुनिता भिमा नरोटे (एसीएम, भामरागड दलम), वय ३५ वर्ष, रा. पिपली बुर्गी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, १०) अंजु ऊर्फ छाया दसरु वड्डे (एसीएम, पश्चिम सब झोनल टेलर टिम) वय २५ वर्षे, रा. झुरी, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली ११) अरुणा ऊर्फ सोमारी ऊर्फ प्रिती येर्रा तलांडी (एसीएम, डॉक्टर टिम) वय ३० वर्षे, रा. जिंजगाव, तह. भामरागड, जि. गडचिरोली व १२) दिलीप ऊर्फ सुधाकर कारु मोहंदा (सदस्य, कंपनी क्र. १०) वय २८ वर्षे, रा. मुरंगल, तह. भामरागड, जि. गडचिरोली यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.


विशेष म्हणजे याच वर्षी दिनांक ०१/०१/२०२५ रोजी दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटीची सदस्य ताराक्का सिडाम हिच्यासह एकूण ११ जहाल माओवाद्यांनी मुख्यमंत्री तथा गृह मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विगातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला होता.

मुख्यमंत्री म.रा. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भेटीदरम्यान गडचिरोली पोलीस दलामार्फत दिनांक ०९ मार्च २०२५ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या अति-संवेदनशिल पोस्टे कवंडे येथे भेट देऊन पोस्टे कवंडे येथील जवानांच्या अभियानाच्या तयारीची पाहणी केली. तसेच पोस्टे कवंडे येथील गडचिरोली पोलीस, सिआरपीएफ, एसआरपीएफ व सी-६० च्या जवानांसोबत संवाद साधला व अशा प्रतिकुल अतिसंवेदनशिल ठिकाणी पोलीस स्टेशन स्थापना व त्याच्या संरक्षणाबद्दल केलेल्या प्रयत्नांसाठी जवानांची प्रशंसा केली.

याच वेळी मुख्यमंत्री यांचे हस्ते पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या जनजागरण मेळाव्यात उपस्थित नागरिकांना स्प्रे पंप, स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, वाजंत्री साहित्य, शिलाई मशिन, ब्लॅकेट, लोवर-टीशर्ट, धोतर, घमेले, महिलांना साड्या व चप्पल, तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल, पेन, नोटबुक, स्कुल बॅग, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल व नेट, कपडे, कंपॉस, चॉकलेट, बिस्कीट इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले. सदर मेळाव्यात अतिदुर्गम पोस्टे कवंडे हद्दीतील १००० हून अधिक नागरीक उपस्थित होते. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधताना सांगितले की, रस्ते, पूल आणि मोबाईल टॉवर्सच्या बांधकामांसह या भागाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

यावेळी आयोजित गडचिरोली येथील कार्यक्रमादरम्यान गडचिरोली पोलीस दलास जिल्हा नियोजन समिती यांच्या वतीने माओवाद विरोधी अभियानाकरीता प्राप्त १९ चारचाकी वाहनांचे मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी, गिरीधर आणि ललीता यांच्यासह एकूण १३ आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्यांचा विवाह सोहळा, पोलीस मुख्यालय येथील शहीद पांडू आलाम सभागृह येथे मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म.रा. श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थितीत पार पडला.

यावेळी पोलीसच आत्मसमर्पित माओवाद्यांचे वहाडी झाल्याचे पहायला मिळाले. मान्यवरांच्या हस्ते सर्व दाम्पत्यांना पुढील आयुष्यासाठी संसार उपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. लॉएड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमीटेड यांच्याकडून सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी योगदान देण्यात आले.

त्यानंतर पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे आयोजित कार्यक्रमात मौजा कवंडे जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये ०१ दलम कमांडरसह एकूण ०४ कट्टर माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश प्राप्त करुन माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच दिनांक २०/०५/२०२५ रोजी अबुझमाडच्या बिनागुंडा परिसरातून ०१ डिव्हीसीएमसह एकूण ०५ जहाल माओवाद्यांना मोठ्या शिताफिने अटक करण्यात आली होती. या दोन्ही अभियानात सहभागी विशेष अभियान पथकातील अधिकारी च जवानांचा मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच मौजा कवंडे चकमकीचे नेतृत्व करणारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर दिनांक ११/०२/२०२५ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत मौजा दिरंगी-फुलनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीत शहीद झालेले पोशि/महेश कवडू नागुलवार यांच्या कुटुंबियांस एक कोटी दहा लाख रुपयाचा धनादेश आज मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म.रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी मा. मुख्यमंत्री यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उर्वरीत माओवाद्यांना हिंसेचा त्याग करुन आपली शस्त्रे खाली ठेवून सन्मानाचे जीवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामिल होत शांततेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले.

या विविध कार्यक्रमांसाठी मा. अॅड. श्री. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री गडचिरोली जिल्हा, मा. श्री. राजे धर्मरावबाबा आत्राम, आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र, मा. श्री. डॉ. मिलिंद नरोटे, आमदार गडचिरोली विधानसभा मतदार संघ, मा. श्री. मिलींद म्हैसकर, अपर मुख्य सचिव (वने) तथा पालक सचिव, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा, उपमहानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ, श्री. अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी गडचिरोली, श्री. नीलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. एम. रमेश अपर पोलीस अधीक्षक (अभियान), श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस मुख्यालय, गडचिरोली तसेच सर्व शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.