राजुरा:- काल संध्याकाळी वरुर–विरुर मार्गावर आलेल्या पूरसदृश परिस्थितीत चिचबोडी, शिर्सी, टेंबुरवाही भागांत पाणी साचल्यामुळे वाहतुकीची दैना उडाली. विशेषतः शालेय मुलांची दोन बस टेंबुरवाही मार्गावर अडकून पडली. जवळपास ६० विद्यार्थी पावसात आणि पुराच्या पाण्यात अडकले होते, या संपूर्ण परिस्थितीला हाताळताना विरुर पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत धाडसाने आणि तत्परतेने कार्यवाही करत विद्यार्थ्यांना सहकार्य केले.
दिवसभराच्या पावसामुळे वरुर–विरुर मार्गावरील नाले भरून वाहू लागले. टेंबुरवाही फाट्यावर, तसेच चिचबोडी व शिर्सी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहने थांबली, वर्दळ ठप्प झाली. शाळेतील दोन बस या रस्त्यावर अडकल्या होत्या. पाणी एवढं वाढलेलं की, वाहनचालकांनाही पुढे जाण्याचा मार्ग दिसत नव्हता.
याच वेळी बसमध्ये ६० विद्यार्थी आणि काही शिक्षक अडकून पडले होते. अंधार, पावसाची संततधार, मोबाईल नेटवर्क नसणे – या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत पालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी विरुर पोलीस ठाण्याशी संपर्क केला.
संपर्क मिळताच ठाणेदार संतोष वाकडे यांनी वेळ न घालवता आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस जीप पाण्यात उतरवत, आधी बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. त्यांना पिण्याचे पाणी, बिस्किटे व तत्काळ धीर देणारी माहिती दिली.
संपूर्ण अंधारात आणि जोरदार पावसात पोलिसांनी दोन वेळा पाण्यातून फेरफटका मारत परिस्थितीचा आढावा घेतला. पाण्याचा प्रवाह कमी होताच, ठाणेदार वाकडे स्वतः समोर पोलिस जीप लावून मार्ग दाखवत दोनही बसेस सुरक्षित बाहेर काढल्या.
रात्रभर प्रयत्न, अखेर सुखरूप घरी पोहोचवले
रात्र झाली तरी पोलिसांनी आपले कार्य थांबवले नाही. विद्यार्थी बसमधून सुटले तरी त्यांना घरी पोहोचवण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. रात्री १२ वाजेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहोचवण्यात आले. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक जाधव, तसेच कर्मचारी राहुल वैद्य, विजय मुंडे, हर्षल लांडे आणि इतर जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पालकांचा पोलिसांप्रती कृतज्ञभाव
या घटनेनंतर पालकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे व तत्परतेचे मनापासून कौतुक केले. "आमच्या मुलांचे प्राण वाचवले, हे आम्ही विसरणार नाही. पोलिसांनी खरे अर्थाने मानवतेचे दर्शन घडवले," असे म्हणत अनेकांनी सामाजिक माध्यमांवरून विरुर पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.