चंद्रपूर:- एकीकडे स्थानिक पावसाचा जोर, तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत होत असल्याने नदीने रौद्ररूप धारण केले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातून वाहणारी वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू केली आहे.
वैनगंगा दुथडी भरून वाहत
चंद्रपूर जिल्ह्यातही वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. वैनगंगा दुथडी भरून वाहत असल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक नदी-नाल्यांची पाणी पातळी वाढली आहे. मुडझा-गांगलवाडी आणि गांगलवाडी-आरमोरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास तालुक्यात पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची एक टीम ब्रह्मपुरीमध्ये दाखल झाली आहे. तसेच पिंपळगाव-भोसले गावात वैनगंगा नदीचे पाणी शिरले आहे. त्यासोबतच भूती नाल्यावरील लहान पूल वाहून गेल्याने ब्रह्मपुरी-अर्हेर नवरगाव मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. ज्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.