Click Here...👇👇👇

Holiday declared: "या" तालुक्यात उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याला भारतीय हवामान खात्याने 7 जुलै 2025 रोजी दिलेल्या अंदाजानुसार "ऑरेंज अलर्ट" जारी केला असून, पुढील काही दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूरचे अध्यक्ष विनय गौडा जी. सी. यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये आणि खाजगी कोचिंग क्लासेसना उद्या, 10 जुलै 2025 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.


या संदर्भात जारी केलेल्या आदेशात जिल्हाधिकारी गौडा यांनी म्हटले आहे की, गोसीखुर्द प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून मिळालेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार, गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे धरणातून वैनगंगा नदीपात्रात पूर नियंत्रणासाठी 16500 ते 18000 क्यूमेक्सपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून, गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शालेय विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हा आदेश केवळ ब्रह्मपुरी तालुक्यासाठी लागू असेल. जिल्ह्यातील इतर तहसील क्षेत्रांतील शाळांना हा आदेश लागू होणार नाही. सुट्टीच्या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्कालीन व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.