मुनगंटीवार-अहीर यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे नेमके कारण काय?
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमधील अंतर्गत कलह आता थेट मुंबईपर्यंत पोहोचला आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी खासदार हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. ११ पैकी केवळ भिसी व चिमूरमध्ये भाजपला विजय मिळवता आला. या पराभवानंतर भाजपमधील गटबाजी उफाळून आली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. "पक्ष नेतृत्वाने माझी शक्ती कमी केली, पक्षाची दारे शनी शिंगणापूरसारखी खुली केली," असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता.
या वादात हंसराज अहीर यांनीही उडी घेतली. "मंत्री पद असल्यामुळेच कुणी निवडून येतो, हा समज चुकीचा आहे," असे म्हणत त्यांनी मुनगंटीवारांवर पलटवार केला. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी जोरगेवारांनी सरसंघचालकांच्या कार्यक्रमात खोडा घातल्याचा आरोप करत आगीत तेल ओतण्याचे काम केले.
या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनंतर, मंगळवारी मुंबईत नाट्यमय घडामोडी घडल्या. आमदार सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर या दोघांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. मुनगंटीवार यांनी 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्र्यांशी विविध विकासात्मक कामांवर चर्चा केली.
या भेटीत मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिका मांडली. शेतकऱ्यांना धानाचा प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस द्यावा. धान खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवावी. अतिवृष्टीग्रस्तांना ३ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी मदत मिळावी. बल्लारपूरमध्ये ईएसआयसी रुग्णालय आणि विसापूर येथे महिला औद्योगिक वसाहतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
दुसरीकडे हंसराज अहीर यांनीही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करत विविध विषयांवर चर्चा केली. या भेटींमुळे भाजपमधील अंतर्गत वाद शमणार की ही केवळ आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वीची रणनीती आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच चंद्रपूर भाजपमधील हा कलह आगामी काळात काय वळण घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

