Chandrapur BJP: किशोर जोरगेवारांना निवडणूक प्रमुख पदावरुन हटवलं!

Bhairav Diwase

जोरगेवार-मुनगंटीवार संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय?
चंद्रपूर:- महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना बाजुला करून निवडणूक प्रमुख पद अजय संचेती यांच्याकडे सोपवले आहे. माजी खासदार अशोक नेते निवडणूक प्रभारी कायम आहे.


भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करण्यात आलेल्या फेरनियुक्त्यांमध्ये हा बदल करण्यात आला. यापूर्वी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे निवडणूक प्रमुख म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, गटबाजी उफाळून आल्याने पक्षाने सावध भूमिका घेत अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


पक्षसंघटन, समन्वयाचा अभाव, अंतर्गत नाराजी यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. चंद्रपूरसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकेत भाजप कोणतीही जोखीम घ्यायला तयार नसल्याचे या निर्णयातून स्पष्ट होते. ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या हालचालींमुळे चंद्रपूरातील भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. आता गटबाजी संपुष्टात आणण्याचे आव्हान संचेतींपुढे असणार आहे.