Chandrapur News: भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष टोकाला; उमेदवारांची निवड नागपुरात होणार!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांनी निवडणूक रणनीती आखण्यास वेग दिला असताना, भाजपमध्ये मात्र उमेदवार निवडीवरून अंतर्गत संघर्ष टोकाला पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची उमेदवार निवड प्रक्रिया आता चंद्रपूरऐवजी थेट नागपुरात केंद्रित झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


याबाबत आज नागपुरात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अत्यंत महत्त्वाची व निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर आणि आमदार किशोर जोरगेवार उपस्थित राहणार असल्याचे समजते. या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये समन्वय साधून महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


चंद्रपूर शहरात आपापल्या समर्थकांना तिकीट मिळावे, यासाठी या तिन्ही नेत्यांची जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपमधील गटबाजी आणि सत्तासंघर्ष इतका तीव्र झाला आहे की, त्याचे पडसाद आता रस्त्यांपासून सोशल मीडियापर्यंत उमटू लागले आहेत. विशेषतः मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील मतभेद उघडपणे समोर आले असून, त्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा अंतर्गत संघर्ष आता चंद्रपूरपुरता मर्यादित न राहता मुंबई व नागपूरच्या राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरल आहे.


भाजपमधील वाढती अस्वस्थता आणि नाराजी पक्ष नेतृत्वासाठी मोठे आव्हान बनली आहे. उमेदवार निवडीत नेमक कोणाचा प्रभाव अधिक राहणार, निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढविली जाणान आणि कोणाच्या वाट्याला समाधान तर कोणाच्या वाट्याला नाराजी येणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाल असून सामान्य नागरिकांचेही आता याकडे लक्ष लागले आहे.