मुंबई:- राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाले. पण विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात मात्र अपेक्षित असणारे यश भाजपाला मिळवता आले नाही. जिल्ह्यात ११ पैकी ७ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त करत पक्षनेतृत्वावर टीका केली होती.काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, तर आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली, असे विधान सुधीर मुनगंटावीर यांनी केले होते. त्यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मुख्यमंत्र्यांनी देखील मुनगंटीवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती. आता या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर अचानक सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
काल 23 डिसेंबर सुधीर मुनगंटीवार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल मुनगंटीवार यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी आज भेट घेऊन विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी शेतकऱ्यांना धानाचा प्रति हेक्टर २० हजार बोनस, आधारभूत धान खरेदी नोंदणीची अंतिम तारीख ३१ जानेवारीपर्यंत वाढविणे, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून ३ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांना मदत, तसेच बल्लारपूर येथे ईएसआयसी रुग्णालय, राज्य राखीव पोलीस बल व महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी मौजा विसापूर येथील बंद असलेल्या पावर हाऊसची ३१.३५ हेक्टर मधील जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात तसेच आदी विषयांवर आग्रही मागणी केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या सर्व मागण्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले. शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि आरोग्यविषयक महत्त्वाच्या प्रश्नांसाठी दाखवलेल्या या संवेदनशील व दूरदर्शी भूमिकेबद्दल त्यांचे मनस्वी आभार. असे ट्वीट सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

