चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ ही राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात राबविण्यात येणार आहे. संघटन अधिक सुदृढ करणे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नियोजनबद्ध व प्रभावीपणे पार पाडणे या दृष्टीने प्रदेश भाजपकडून त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत नियुक्तीपत्र जाहीर करून या निर्णयाला अधोरेखित केले आहे.
आमदार चैनसुखजी संचेती यांची निवडणूक निरीक्षक म्हणून, माजी खासदार अशोकजी नेते यांची निवडणूक प्रभारी म्हणून, तर आ. किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी नियोजनबद्ध, समन्वयित आणि गतिमान अभियान उभारले जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करणारे आ. सुधीर मुनगंटीवार हे या निवडणुकीचे प्रमुख प्रेरणास्त्रोत ठरणार आहेत. अफाट लोकसंपर्क, कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारे निर्णयक्षम नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. महानगरपालिका निवडणूक ही केवळ राजकीय स्पर्धा नसून चंद्रपूरच्या पुढील पाच वर्षांच्या विकासआराखड्याचा पाया आहे, असा दूरदर्शी दृष्टिकोन त्यांनी मांडला असून आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात संघटनेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

