Agriculture News : जैरामपुर येथे महिलांना शेतीविषयक मार्गदर्शन

Bhairav Diwase

चामोर्शी:- कृषी विभागाच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा - 2 गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये राबवीत असून विविध योजना व कार्यक्रम यामध्ये निर्देशित केले आहेत. प्रकल्पांतर्गत जैरामपुर गावातील धान पिकाकरीता महिला शेतीशाळेमध्ये निवड झाली असून दिनांक 25 सप्टेंबरला धान शेतीशाळेचा दुसरा वर्ग घेण्यात आला.
शेतीशाळा म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या शेतात, पिकाच्या अवस्थांसह आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे. शेतकऱ्यांच्या शेतात उद्भवणाऱ्या समस्यांचा स्थानिक पातळीवर तोडगा काढण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. शेतकऱ्यांना शेतीशाळेत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली व महिलांना चार्ट तयार करून धान पिकाचे पीक परिसंस्था निरीक्षण क्षेत्रनिहाय प्रत्येक गटामध्ये चित्रीकरण व सादरीकरण करण्यात आले.


सहाय्यक कृषी अधिकारी जैरामपुर कु. एस. एस. गावडे यांनी धान पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन, कृषी विभागाच्या विविध योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजना, फळबाग लागवड, बांबु लागवड, फॅरोमेन सापळा प्रात्यक्षिक तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणारा माहितीस्त्रोत AI अॅपची प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर माहिती दिली.


शेतकऱ्यांना प्रामुख्याने निगडीत असलेल्या शेतकरी क्रमांक (Farmer ID) तयार करून व पीएम किसान योजनेंविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच कार्यालयात स्वतंत्र पीएम किसान डेस्क तयार केली असून अडचण असलेल्या शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक, बँक पासबुक व सातबारा घेऊन येऊन याचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात आले. सदर शेतीशाळेला उपस्थित जैरामपुर येथील सरपंच दिपाली सोयाम, प्रगतशील शेतकरी सतीश गौरकार उपस्थित होते तसेच ग्रामसंघ प्रतिनिधी सोनी चुनारकर, कृषी सखी वैशाली अलोने व महिला शेतकरी वर्ग होते. सरपंच दिपाली सोयाम यांनी शेतीशाळा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून सगळ्या महिलांनी यात सहभागी होऊन शेतशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतातील समस्यांबाबत मार्गदर्शन व कृषी योजनांची माहिती मिळत असते असे सांगितले. शेतकऱ्यांनी या माध्यमातून आपल्या शेतातील अडचणींचे समाधान करून घ्यावे, असे आवाहन महिला शेतकऱ्यांनी केले.

आधार न्युज नेटवर्क/ रितेश एस. आसमवार, चामोर्शी तालुका प्रतिनिधी