चंद्रपूर:- राष्ट्रीय अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्यांना एका विश्रामगृहात दारू पार्टी करताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. या घटनेने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील 6-7 अभियंत्यांना वसंत भवन विश्रामगृहातील खोली क्रमांक 107 मध्ये ओली पार्टी करताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी धडक देत केली. राईकवार यांच्या नेतृत्वाखालील पथक जेव्हा विश्रामगृहात पोहोचले, तेव्हा पार्टी सुरू होती.
पथकाने धाड मारताच सर्व अभियंते घाबरले आणि सैरावैरा पळू लागले. काही अभियंते तर बाथरूममध्ये लपण्याचा प्रयत्न करताना दिसले. सुरुवातीला कुणीही आपलं नाव सांगायला तयार नव्हते. मात्र, तपासणी केल्यावर घटनास्थळी बांधकाम विभागातील अभियंत्यांची ओळखपत्रे सापडली. यामुळे त्यांची ओळख पटली
या घटनेची माहिती तात्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांना देण्यात आली. जेव्हा या प्रकरणी सिंग यांना संपर्क साधून चौकशीबद्दल विचारणा केली, तेव्हा ते म्हणाले, "आम्ही या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करू."
या घटनेमुळे जिल्हा परिषदेतील कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राष्ट्रीय अभियंता दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशीच अशी घटना घडल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे. आम आदमी पार्टीने या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.