Chlorine gas leak: रहमतनगर गॅस गळती प्रकरण: प्लांट संचालक आणि कर्मचारी जबाबदार; निदा हुसेनचा आरोप

Bhairav Diwase

चंद्रपूर:- रहमतनगर येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून झालेल्या क्लोरीन वायू गळतीमुळे एका महिलेची प्रकृती गंभीर असून ती अजूनही आयसीयूमध्ये आहे. या प्रकरणी, संबंधित प्लांटचे संचालक आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


रहमतनगर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या क्लोरीन वायू गळतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत अनेक लोक आजारी पडले. त्यापैकीच एक महिला, शबाना परवीन शब्ददार शेख यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत. या घटनेनंतर त्यांच्या कन्या, निदा फातेमा सफदर हुसेन यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गंभीर आरोप केले आहेत.


निदा यांच्या म्हणण्यानुसार, प्लांट चालवणारे विश्वराज एनवॉरमेंट प्रा. लि. चे श्रीकृष्ण वर्मा आणि इतर जबाबदार कर्मचाऱ्यांना गॅस गळतीची पूर्वमाहिती होती, परंतु त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. याच दुर्लक्षामुळे हा अपघात घडला, ज्यामुळे त्यांच्या आईला फुफ्फुसांचे गंभीर नुकसान झाले. त्यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दुर्लक्ष करणाऱ्या प्लांट संचालक आणि कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावर फौजदारी खटला चालवण्याची मागणी केली आहे.


निदा यांनी पत्रकार परिषदेत असेही सांगितले की, त्यांच्या आईने गॅस गळतीनंतर अनेक लोकांना सुरक्षित स्थळी पळून जाण्यास मदत केली. त्यांनी स्थानिक राजकीय नेते, महानगरपालिका आणि सीटीपीएस प्रशासनावरही निष्क्रियतेचा आरोप केला. त्यांचा दावा आहे की स्थानिक नेते फक्त त्यांच्या व्यवसायाकडे लक्ष देत आहेत आणि पीडितांकडे दुर्लक्ष करत आहेत.


याशिवाय, महानगरपालिका आणि सीटीपीएस प्रशासन आपली जबाबदारी टाळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणातील आयोग हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. जर दोषींवर ठोस कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.