MP Pratibha Dhanorkar: चंद्रपूरच्या रहमतनगर भागातील क्लोरीन गॅस गळतीची खासदारांकडून दखल

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरात क्लोरीन गॅस गळती झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून, नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.


यावेळी बोलताना खासदार धानोरकर यांनी सांगितले की, "गॅस गळतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेची गय केली जाणार नाही."

त्यांनी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत:

गॅस गळतीचे नेमके कारण काय, याबाबतची सखोल आणि तातडीने चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा.

घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर आणि तात्काळ कायदेशीर कारवाई करावी.

स्थलांतरित केलेल्या नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत पुरवावी.

ज्या नागरिकांना श्वसनाचा किंवा इतर कोणताही त्रास झाला असेल, त्यांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करावी.

खासदार धानोरकर यांनी या प्रकरणावर आपण स्वतः लक्ष ठेवून असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.